अज्ञात व्यक्तीकडून धानाच्या पुंजन्यांना लावली आग; ४० क्विंटल धान्य झाले स्वाहा

0
 अज्ञात व्यक्तीकडून धानाच्या पुंजन्यांना लावली आग; ४० क्विंटल धान्य झाले स्वाहा 



 शेतकऱ्याचे एक लाख रुपयांचे नुकसान

कोरची : कोरची तालुक्यातील हेटाळकसा येथील शेतशिवारात अज्ञात व्यक्तीने धानाच्या पुंजन्यांना आग लावल्याची घटना उघडकीस आली आहे. या आगीत शेतकरी इंदरसाय दसरू कोरेटी (वय ७३) यांच्या शेतातील सुमारे ४० क्विंटल धान जळून खाक झाले. या घटनेत त्यांचे अंदाजे एक लाख रुपयांचे नुकसान झाले असून, अज्ञात आरोपीविरुद्ध कोरची पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



प्राप्त माहितीनुसार, इंदरसाय कोरेटी यांनी आपल्या शेतात पावसाळी हंगामातील धानाची कापणी करून सात ते आठ दिवसांपूर्वी धानाचे भारे एकत्रित करून दोन वेगवेगळे पुंजणे तयार केले होते. दरम्यान, २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ ते २५ नोव्हेंबरच्या पहाटे ३ वाजताच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने शेतात कोणीही नसल्याची संधी साधून दोन्ही धानाच्या पुंजन्यांना आग लावली. या आगीत सुमारे ६०० भारे म्हणजेच ४० क्विंटल धान्य पूर्णपणे जळून खाक झाले.

यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने शेतकऱ्यांना धानाचे पीक घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. प्रतिकूल परिस्थितीत काबाडकष्ट करून पिकविलेल्या धानाची काढणी केल्यानंतर ते सुरक्षित ठेवण्यासाठी शेतात पुंजणे तयार करण्यात आले होते. मात्र, अज्ञात व्यक्तीच्या कृत्यामुळे शेतकऱ्याच्य वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले. आधीच नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यावर या घटनेमुळे मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.

घटनेप्रकरणी इंदरसाय कोरेटी यांनी कोरची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तोंडी तक्रारीवरून अप.क्र. १५३/२०२६, कलम ३२६ (एफ), भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास कोरची पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक सोनाली बल्हाळ करीत आहेत.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !