एकाच रूममधील चार मैत्रिणींचा इतिहास घडवणारा पराक्रम; पोलीस भरतीत एकाचवेळी चौघींची निवड

0

एकाच रूममधील चार मैत्रिणींचा इतिहास घडवणारा पराक्रम; पोलीस भरतीत एकाचवेळी चौघींची निवड


ग्रामीण भागातून आलेल्या मुलींची जिद्द, मेहनत आणि नियोजनाचा अनोखा संगम; चंद्रपूर जिल्ह्यात अभिमानाची बाब

चंद्रपूर, प्रतिनिधी :
स्वप्न मोठं असेल, मेहनत प्रामाणिक असेल आणि जिद्द अटळ असेल तर यश निश्चित मिळतं, याचा जिवंत पुरावा चंद्रपूर जिल्ह्यातील चार तरुणींनी घालून दिला आहे. एकाच रूममध्ये राहून, एकाच अभ्यासिकेत अभ्यास करत आणि एकाच ध्येयासाठी झटत या चौघींनी पोलीस शिपाई भरती 2024-25 मध्ये एकाचवेळी निवड होऊन इतिहास रचला आहे.
कु. प्रतीक्षा संजय सोनुले (रा. केळझर), कु. पूजा रमेश मांदाडे (रा. बेंबाळ), कु. सुप्रिया राजू बालुगवार (रा. बेंबाळ) आणि कु. प्रियाली प्रकाश वासेकर (रा. सिंतळा) या चारही मैत्रिणींनी ग्रामीण भागातून येऊन जिल्हा मुख्यालयात राहून आपले पोलीस बनण्याचे स्वप्न पूर्ण केले.
पोलीस भरतीसाठी आवश्यक असलेली मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा याबाबत त्यांनी सुरुवातीपासूनच सखोल माहिती घेतली. कोच व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली योग्य नियोजन करून त्यांनी सातत्याने सराव आणि अभ्यास केला. कठोर परिश्रम, शिस्त आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी प्रथम मैदानी चाचणीत उत्कृष्ट गुण मिळवत लेखी परीक्षेसाठी पात्रता मिळवली.
यानंतरही त्यांनी हार न मानता अधिक जिद्दीने अभ्यास सुरू ठेवला आणि लेखी परीक्षेतही उल्लेखनीय यश संपादन केले. मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षेच्या गुणांची सांगड घालत त्यांनी अंतिम मेरिटमध्ये स्थान मिळवून पोलीस दलात आपली जागा निश्चित केली.
विशेष म्हणजे, मूल तालुक्यातील या चारही मुली एकाच रूममध्ये राहून, एकाच अभ्यासिकेत अभ्यास करत आणि एकाच भरती प्रक्रियेत एकाचवेळी निवड होणे हा पोलीस भरतीच्या इतिहासातील एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी पराक्रम मानला जात आहे.
या यशामुळे त्यांनी आपल्या आई-वडिलांचे, मार्गदर्शकांचे आणि गावाचे नाव उज्ज्वल केले असून, त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !