दारूबंदीच्या जिल्ह्यात पोलीसच मद्यधुंद! गडचिरोलीत दोन पोलिसांचा रस्त्यावर धिंगाणा
दुचाकीसह रस्त्यावर कोसळले; नागरिकांना धमक्या देत “एसपीने सर्चिंगला पाठवले” अशी करीत होते बतावणी — कारवाईकडे सर्वांचे लक्ष
गडचिरोली :
दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात कायद्याचे रक्षण करणारे पोलीस कर्मचारीच दारूच्या नशेत रस्त्याच्या कडेला पडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आठवडी बाजार परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून पोलीस विभागाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले दोन पोलीस कर्मचारी दुचाकीवरून आठवडी बाजार परिसरात आले होते. तेथे अवैधरीत्या विक्री होत असलेल्या दारूचे सेवन केल्यानंतर ते पुन्हा दुचाकीने निघण्याचा प्रयत्न करत होते. मात्र अतिशय नशेत असल्याने दुचाकीचा तोल जाऊन दोघेही रस्त्याच्या कडेला पडले. त्यांची अवस्था इतकी बिघडलेली होती की त्यांना नीट उभे राहणेही शक्य होत नव्हते.
ही घटना पाहून परिसरातील नागरिकांनी त्यांना गाडी चालवू नये अशी विनंती केली. मात्र मद्यधुंद अवस्थेत असलेल्या दोन्ही कर्मचाऱ्यांनी उलट नागरिकांनाच दमदाटी करत “गाडीने उडवून देऊ” अशी धमकी दिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. एवढेच नव्हे तर “आम्हाला एसपी साहेबांनी सर्चिंगसाठी पाठवले आहे” अशी खोटी माहिती देत लोकांना घाबरवण्याचाही प्रयत्न त्यांनी केल्याचे समोर आले आहे.
घटनेची गंभीरता लक्षात घेऊन काही जागरूक नागरिकांनी तात्काळ पोलीस ठाण्यात फोन करून माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच पोलीस ठाण्यातून चारचाकी वाहन घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले तसेच त्यांची दुचाकीही जप्त करून पोलीस ठाण्यात आणली.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्यांची नावे विचारली असता एकाने स्वतःचे नाव राजेंद्र कदम तर दुसऱ्याने हरिदास जाधव असे सांगितले. त्यापैकी हरिदास जाधव याने “मी अतिरिक्त पोलीस अधीक्षकांचा रायटर आहे, लक्षात ठेवा, नाहीतर पाहून घेईन,” अशी धमकी दिल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणाची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही देण्यात आली असून दोन्ही कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. त्यांनी मद्यप्राशन केले होते का याची खात्री केली जाणार असून वाहतूक नियमांनुसार ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ प्रकरणातही कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात वर्दीधारी पोलीस कर्मचारीच मद्यधुंद अवस्थेत आढळल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. “अशा कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी,” अशी मागणीही जोर धरू लागली असून आता या प्रकरणात वरिष्ठ अधिकारी कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

