गडचिरोली जिल्ह्यात सर्वांगीण विकासासाठी प्रादेशिक आराखडा होणार; नियोजन प्रक्रीयेला येणार वेग
गडचिरोली, 26 नोव्हेंबर 2026 :- गडचिरोली जिल्ह्याच्या नियोजनबद्ध, संतुलित आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या प्रादेशिक योजनेच्या निर्मिती प्रक्रियेला आता वेग आला आहे. जिल्ह्याच्या भविष्यातील विकासाची दिशा निश्चित करण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार प्रादेशिक नियोजन मंडळामार्फत पुढाकार घेण्यात आला असून, ही योजना तयार करण्यासाठी तज्ज्ञ संस्थेची नियुक्ती करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याच अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा प्रादेशिक नियोजन मंडळाचे अध्यक्ष अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली २५ नोव्हेंबर रोजी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी प्रादेशिक योजना तयार करण्याबाबत आपापली सविस्तर सादरीकरणे केली.
महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ मधील कलम ४(१) अन्वये राज्य शासनाने गडचिरोली प्रादेशिक योजना तयार करण्यासाठी प्रादेशिक नियोजन मंडळाची स्थापना केली आहे. या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या भौगोलिक, सामाजिक, आर्थिक आणि नैसर्गिक परिस्थितीचा विचार करून भविष्यातील विकासाचे नियोजन करण्यात येणार आहे. यासाठी योग्य तज्ज्ञ संस्थेची निवड करण्याच्या दृष्टीने बैठकीत विविध पर्यायांवर चर्चा करण्यात आली.
या बैठकीला आमदार डॉ. मिलिंद नरोटे, गडचिरोली नगर परिषदेच्या नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक, नगररचना विभागाचे सहायक संचालक तसेच प्रादेशिक नियोजन मंडळाचे अन्य सदस्य प्रत्यक्ष व दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
बैठकीत जिल्ह्यातील जमिनीच्या वापराचे योग्य नियोजन, शहरी व ग्रामीण भागांचा समतोल विकास, कृषी आणि औद्योगिक क्षेत्राचा विस्तार, रस्ते व वाहतूक व्यवस्था, पायाभूत सुविधांची उभारणी, वनसंपदा आणि जलसंपत्तीचे संवर्धन, पर्यावरण संरक्षण तसेच भविष्यातील नागरीकरण या महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर विचारमंथन करण्यात आले.
गडचिरोली जिल्ह्यात औद्योगिकीकरणाच्या वाढत्या संधी, नवीन पायाभूत सुविधांची आवश्यकता आणि भविष्यात होणारा नागरी विस्तार लक्षात घेता विकासाचे नियोजन दूरदृष्टीने करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. विकासाच्या प्रक्रियेत जिल्ह्यातील नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण, पर्यावरणाचा समतोल आणि स्थानिक नागरिकांच्या गरजांना प्राधान्य देणे आवश्यक असल्याचेही अधोरेखित करण्यात आले.
गडचिरोली जिल्ह्याच्या भविष्यातील विकासाचा ठोस आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने ही प्रादेशिक योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे. औद्योगिक प्रगतीसोबतच कृषी, ग्रामीण विकास, वाहतूक, नागरी सुविधा आणि पर्यावरण संवर्धन यांचा समन्वय साधून जिल्ह्याच्या सर्वांगीण व शाश्वत विकासाला दिशा देण्याचा या योजनेचा उद्देश आहे. हे उद्दिष्ट सफल होणार काय?

