बंदी असलेल्या सुगंधीत तंबाखूच्या अवैध साठ्यावर पोलिसांचा धाड ;६६ हजारांचा मुद्देमाल जप्त
कुनघाडा :- चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा येथे बंदी असलेल्या सुगंधित तंबाखूचा साठा असल्याची गुप्त माहिती मिळताच चामोर्शी पोलिसांनी धाड टाकून कारवाई करीत तब्बल ६६ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत हुक्का शिशा तंबाखूचे डबे, पाकिटे आणि तंबाखू पॅकिंगसाठी वापरण्यात येणारे इलेक्ट्रिक मशीन पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांच्या या कारवाईने परिसरातील अवैध तंबाखू साठवणूक व विक्रीच्या प्रकारांवर लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
२१ नोव्हेंबर २०२६ रोजी गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे चामोर्शी पोलीस पथकाने मौजा कुनघाडा येथे छापा टाकला. यावेळी तपासणीदरम्यान १५ हजार ६७५ रुपये किमतीचे हुक्का शिशा तंबाखूचे ५५ डबे, २६ हजार १४५ रुपये किमतीचे हुक्का शिशा तंबाखूचे ६३ पाकिटे, तसेच २५ हजार रुपये किमतीचे तंबाखू मिश्रण डब्यांमध्ये पॅकिंग करण्यासाठी वापरण्यात येणारे लोखंडी इलेक्ट्रिक मशीन असा एकूण ६६ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी अनिल रामजी वासेकर वय ५१ वर्षे, रा. वॉर्ड क्रमांक २, कुनघाडा, ता. चामोर्शी यांना सूचना पत्र देऊन सोडण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या हुक्का तंबाखूच्या साठ्याबाबत पुढील कायदेशीर कारवाई करण्यासाठी सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, गडचिरोली यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला असून संबंधित विभागाकडून पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली चामोर्शी पोलिसांनी केली. अवैध तंबाखू साठवणूक व संबंधित गैरप्रकारांवर पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात येत असल्याचा संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.

