शेतकऱ्यांचा विरोध डावलून लोहखनिज प्रकल्पासाठी जमीन मोजणी; परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त

0
शेतकऱ्यांचा विरोध डावलून लोहखनिज प्रकल्पासाठी जमीन मोजणी; परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त



आष्टी -चामोर्शी तालुक्यातील मुधोली व जयरामपूर परिसरात प्रस्तावित लोहखनिज उद्योग प्रकल्पासाठी जमीन मोजणीचे काम सुरू करण्यात आले असून, या प्रक्रियेला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. शेतकऱ्यांचा विरोध कायम असतानाही प्रशासनाने कडेकोट पोलिस बंदोबस्तात जमीन मोजणी सुरू केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

माहितीनुसार, या भागात उभारण्यात येणाऱ्या लोहखनिज आधारित उद्योग प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात शेतीजमिनीचे संपादन प्रस्तावित आहे. मात्र, ही जमीन सुपीक असून तीच शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा प्रमुख आधार असल्याने अनेक शेतकरी जमीन देण्यास तयार नसल्याचे सांगितले जात आहे.

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, शासन व प्रशासनाने कोणताही ठोस संवाद न साधता आणि त्यांना विश्वासात न घेता जमीन मोजणीची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच जमिनीचा योग्य मोबदला न देता कवडीमोल दरात जमीन अधिग्रहित करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांनी प्रशासनाने आधी ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांच्या शंकांचे निरसन करावे, योग्य मोबदला व पुनर्वसनाबाबत स्पष्ट धोरण जाहीर करावे, अशी मागणी केली आहे. अन्यथा जमीन संपादन प्रक्रियेला तीव्र विरोध कायम ठेवण्याचा इशारा स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी दिला आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे परिसरात असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासन पुढे काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !