सुभाष सलगर हल्ला प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक करण्यात मंगळवेढा पोलिसांना अपयश
डोंगरगाव च्या ग्रामस्थांतून तीव्र संताप
मंगळवेढा: डोंगरगाव येथील धनगर समाजातील युवक सुभाष शंकर सलगर यांच्यावर प्राणघातक हल्ला करणारे मुख्य सूत्रधार समाधान दादा हेंबाडे व मधुकर राजाराम मोरे यांच्यासह सात आरोपींना अटक करण्यात मंगळवेढा पोलिसांना अपयश आले असून पोलिसांच्या कार्यपद्धती विषयी डोंगरगाव च्या ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष विवेक खिलारे यांच्या बरोबर का फिरतोस ? म्हणून रविवार दिनांक २० जुलै रोजी मंगळवेढा येथील जुना सांगोला नाका चौकात समाधान दादा हेंबाडे व मधुकर राजाराम मोरे यांच्यासह नऊ जणांनी मस्साजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांना ज्या स्टाईलने मारहाण केली त्याच स्टाईलने सुभाष सलगर यांच्यावर अत्यंत निर्दयपणे प्राणघातक हल्ला केला. त्यात सलगर यांच्या डोक्यास गंभीर स्वरुपाची दुखापत व शरीराचे अवयव दोन ठिकाणी फॅक्चर झाले.
त्यावरती मंगळवेढा पोलीसात तक्रार नोंदवून आज दीड महिना उलटूनही यातील समाधान दादा हेंबाडे, मधुकर राजाराम मोरे , संतोष मोरे, बालाजी मोरे, विश्वंभर मोरे , शंकर डांगे, श्रीकांत डांगे हे आरोपी मोकाटपणे फिरत असून पोलिसांच्या भूमिकेविषयी प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.तर या हल्ल्यामागचा मुख्य सूत्रधार समाधान हेंबाडे व मधुकर मोरे यांच्या मोबाईल नंबरची दिनांक २० जुलै पासून ते आजतागायत कॉल डिटेल्स, कॉल रेकॉर्डिग व सीडीआर चौकशी करण्याची मागणी फिर्यादी सुभाष सलगर यांच्या कडून होत आहे.मागासवर्गीय समाजातील व्यक्तींना दारु, मटण व पैशाचे अमिष दाखवून समाधान हेंबाडे त्यांच्यामार्फत गावातील प्रतिष्ठीत व्यक्तींच्या विरोधात खोट्या केसेस नोंदवत असून त्याच्यामुळे गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याचाही पोलीस प्रशासनाने गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.आरोपींना पोलीस प्रशासन पाठीशी घालत असल्याची गावकऱ्यांमध्ये चर्चा होत असून मंगळवेढा पोलिसांच्यावरील विश्वास उडत चालला आहे.

