जपतलई अनुदानित आश्रमशाळेतील तीन विद्यार्थिनींच्या सर्पदंशाने मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी

0
जपतलई अनुदानित आश्रमशाळेतील तीन विद्यार्थिनींच्या सर्पदंशाने मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी


आदिवासी विकास आयुक्तालय नाशिक व नागपूर येथील पथके आज घटनास्थळी; चौकशीनंतर जबाबदारी निश्चित करून दोषींवर कारवाई

सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्याकडून शोक व्यक्त

उपचाराधीन तीन विद्यार्थिनींना तातडीने “सर्पदंश प्रतिबंधक औषध” ; जिल्हाधिकाऱ्यांकडून विशेष काळजी घेण्याचे निर्देश

गडचिरोली, दि. 10 (जिमाका) : धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत संबंधित संस्था व जबाबदार व्यक्तींची जबाबदारी निश्चित करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार आहे. यासाठी आदिवासी विकास आयुक्तालय, नाशिक तसेच नागपूर येथील पथके आज घटनास्थळी दाखल होऊन सविस्तर तपासणी करणार आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी या दुर्दैवी घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करून मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. या घटनेतील अन्य तीन विद्यार्थिनींवर उपचार सुरू असून, “सर्पदंश प्रतिबंधक औषधाचा”(अँटी व्हेनम) पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि उपचाराधीन तिन्ही विद्यार्थिनींना तातडीने सर्पदंश प्रतिबंधक औषध देण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथकाकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. उपचारामध्ये कोणतीही कमतरता राहू नये आणि विद्यार्थिनींची विशेष काळजी घेण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना दिल्या आहेत.

आश्रमशाळेतील सुरक्षाव्यवस्थेची सखोल तपासणी

जपतलई येथील संबंधित आश्रमशाळा ही अनुदानित असून तिला शासनाकडून अनुदान दिले जाते. त्यामुळे निवासी विद्यार्थ्यांची सुरक्षितता, आरोग्य तसेच आवश्यक मूलभूत सुविधा सुनिश्चित करण्याची जबाबदारी संबंधित संस्था आणि व्यवस्थापनाची आहे. या पार्श्वभूमीवर ही दुर्घटना नेमकी कशी घडली, विद्यार्थिनींच्या निवासस्थानी आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात आल्या होत्या का तसेच आश्रमशाळेच्या व्यवस्थापनाकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भातील आवश्यक नियम व उपाययोजनांचे पालन करण्यात आले होते का, या बाबींची सखोल चौकशी करण्यात येणार आहे.

आदिवासी विकास विभागाच्या पथकांकडून घटनास्थळाची पाहणी करून संबंधितांकडून आवश्यक माहिती घेतली जाणार आहे. चौकशीअंती निष्काळजीपणा अथवा सुरक्षाविषयक त्रुटी आढळून आल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करून दोषींविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

सह पालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्याकडून शोक व्यक्त

जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनीही या दुर्दैवी घटनेबद्दल शोक व्यक्त करून मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. उपचाराधीन विद्यार्थिनींना आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपचार आणि सहकार्य उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

दरम्यान, उपचाराधीन तिन्ही विद्यार्थिनींच्या प्रकृतीवर प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. आदिवासी विकास विभागाच्या पथकांकडून करण्यात येणाऱ्या चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यातील निष्कर्षांच्या आधारे संबंधितांची जबाबदारी निश्चित करून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !