सुरजागड खनिज वाहतूक पुन्हा ठरली जीवघेणी! ट्रकच्या धडकेत कामगार ठार; आर्थिक मदतीच्या मागणीवरून रुग्णालयात ठिय्या आंदोलन

0
सुरजागड खनिज वाहतूक पुन्हा ठरली जीवघेणी! ट्रकच्या धडकेत कामगार ठार; आर्थिक मदतीच्या मागणीवरून रुग्णालयात ठिय्या आंदोलन

१० लाख मदत व नोकरीची घोषणा; तरीही कुटुंबीयांचा संताप – “आमच्या माणसाच्या जीवाची किंमत एवढीच का?”


गडचिरोली :
जिल्ह्यातील सुरजागड खनिज प्रकल्पाशी संबंधित वाहनांमुळे वाढत चाललेल्या अपघातांच्या मालिकेत शनिवारी आणखी एक भीषण अपघात घडला. अहेरी तालुक्यातील लगाम गावाजवळ खनिज वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकच्या धडकेत सुरजागड मायनिंग कंपनीत काम करणाऱ्या कामगाराचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मृतकाच्या कुटुंबीयांनी आर्थिक मदतीच्या मागणीवरून गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात ठिय्या आंदोलन केल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, अतुल रामदास बुरे हे आपल्या दुचाकीने लगाम मार्गे हेडरी येथील कामाच्या ठिकाणी जात होते. त्यावेळी खनिज वाहतूक करणाऱ्या एका भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात अतुल बुरे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यांच्या दुचाकीवर मागे बसलेला वैभव आत्राम हा युवक काही वेळापूर्वी लिफ्ट मागून बसला होता. या अपघातात तो जखमी झाला.
घटनेची माहिती मिळताच अहेरी तालुक्यातील पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून अतुल बुरे यांना लगाम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, शवविच्छेदन अहेरी येथे होणे अपेक्षित असताना मृतदेह गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आल्याने मृतकाच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला. रुग्णालयात मोठी गर्दी जमली आणि ट्रक मालक व संबंधित कंपनीकडून आर्थिक मदत जाहीर होईपर्यंत शवविच्छेदन होऊ देणार नाही, अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
परिस्थिती लक्षात घेऊन गडचिरोली पोलीस ठाण्याचे ठाणेदार विनोद चव्हाण पोलिसांच्या फौजफाट्यासह रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी कुटुंबीय, गावकरी, कंपनीचे अधिकारी आणि ट्रक मालकाशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार डॉ. मिलिंद नरोटे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे आणि शिवसेनेचे युवा सेना अध्यक्ष पवन गेडाम हेही कार्यकर्त्यांसह रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी पीडित कुटुंबाला न्याय मिळावा आणि तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी केली.
दिवसभर चाललेल्या चर्चेनंतर अखेर कंपनीच्या वतीने मृतकाच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याची घोषणा करण्यात आली. ही घोषणा आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी जाहीर केल्यानंतर कुटुंबीयांनी शवविच्छेदनास परवानगी दिली आणि सायंकाळी सुमारे सहा वाजता अतुल बुरे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.
मात्र या घोषणेनंतरही कुटुंबीय व काही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. “मरणाऱ्या व्यक्तीचे जीवन केवळ दहा लाख रुपयांतच संपवले का? आमच्या माणसाच्या जीवाची किंमत एवढीच आहे का?” असा संतप्त सवाल कुटुंबीयांनी उपस्थित केला.
मृतक अतुल बुरे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. कुटुंबातील कमावता व्यक्ती अचानक गेल्याने लगाम परिसरात तसेच त्यांच्या मूळ गावात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, सुरजागड खनिज प्रकल्पाशी संबंधित वाहनांमुळे वारंवार अपघात होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला. खनिज वाहतुकीसाठी स्वतंत्र मार्ग तयार करावा, ट्रकचा वेग नियंत्रित करावा आणि अपघात टाळण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी काँग्रेस व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे. भविष्यात अशा प्रकारचे अपघात पुन्हा घडल्यास मोठे आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, दिवसभर निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती पोलिसांनी संयमाने हाताळल्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात मोठा अनर्थ टळल्याचे दिसून आले. मात्र या घटनेमुळे गडचिरोली जिल्ह्यातील खनिज वाहतुकीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !