दोन्ही अवैध कोंबडा बाजारावर पोलीसांची धाड,चार लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त,तर १९ बाजार शौकिनांना अटक
अहेरी : दोन्ही अवैध कोंबळा बाजारावर पोलीसांची धाड टाकून ४.८६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून १९ कोंबडा बाजार शौकिनांना अटक करण्यात आली आहे
कोंबड्यांची झुंज करुन त्यांचेवर पैज लावून जुगार खेळणाऱ्या आंबट शौकीनांना अहेरी पोलिसांनी दि .२४ ऑगस्ट शनिवारला जोरदार चाप दिली आहे
अहेरी तालुक्यातील टेकुलगुडा आणि तलवाडा या दोन्ही गावांत सलग धाडी टाकत पोलिसांनी 4 लाख 86 हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आणि 19 आरोपींना अटक केली. महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम 1887 अंतर्गत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
टेकुलगुडा येथे दुपारी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला. यावेळी पांढऱ्या कोंबड्यांच्या पायांना धारदार कात्या बांधून झुंजी लावत पैशांवर बाजी लावणाऱ्या आरोपींना रंगेहात पकडले. यात 2 लाख 42 हजारांचा मुद्देमाल, तीन कोंबडे, कात्या, दोरी, पट्ट्या आणि पाच दुचाकी जप्त केल्या. त्याच दिवशी सायंकाळी तलवाडा गावात दुसऱ्या कारवाईत 9 आरोपींकडून 6,150 रुपयांची रोकड, सहा जिवंत कोंबडे, सहा कात्या आणि चार दुचाकी जप्त करत 2 लाख 43 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक हर्षल व्ही. ऐकरे यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले, तर तलवाडा कारवाईचा तपास सहायक पोलीस निरीक्षक डी.सी. पटले करीत आहेत. कोंबड्यांच्या झुंजींमुळे प्राण्यांवर होणारी क्रूरता आणि जुगाराच्या माध्यमातून वाढणारी गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्यासाठी ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे. गावकऱ्यांनी अहेरी पोलिसांचे कौतुक केले असून, सामान्य कुटुंबांचे नुकसान टाळण्यासाठी अशा कारवाया कायम सुरू राहाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पोलीस निरीक्षक हर्षल ऐकरे यांनी कठोर इशारा देत म्हटले, "कोंबड्यांच्या झुंजींवर पैज आणि जुगाराचा काळा धंदा खपवून घेतला जाणार नाही. कायदा मोडणाऱ्यांना कुठेही पळता येणार नाही."

