माजी जि.प. अध्यक्ष यांचे अहेरी येथील चार मजली इमारतीवर नगर पंचायतीने चालविले बुलडोझर
अहेरी:-
गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे खंबीर नेते अजय कंकडालवार यांच्या अहेरी येथील चार मजली भव्य व्यावसायिक इमारतीवर नगरपंचायत प्रशासनाने आज बुलडोझर चालविला. राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या या इमारतीसाठी कोणतीही अधिकृत परवानगी नसल्याचा ठपका ठेवत, न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
अजय कंकडालवार यांनी अहेरी येथे राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला एक चार मजली व्यावसायिक इमारत उभारली होती. मात्र, या बांधकामासाठी नगरपंचायतीची कोणतीही तांत्रिक किंवा प्रशासकीय परवानगी घेण्यात आली नव्हती. या बेकायदेशीर बांधकामाबाबत नगरपंचायतीने कंकडालवार यांना वारंवार नोटिसा बजावल्या होत्या. प्रशासनाच्या या भूमिकेविरोधात कंकडालवार यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते
या प्रकरणाची सुनावणी अहेरी न्यायालयात पार पडली. न्यायालयाने दोनवेळा संबंधित बेकायदेशीर इमारत पाडण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, या निर्णयाला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने स्थगिती दिली होती आणि कंकडालवार यांना उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी मुभा दिली होती. मात्र, दिलेल्या मुदतीत त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली नाही. अखेर, अहेरी न्यायालयाचा मूळ निर्णय कायम राहिल्याने नगरपंचायत प्रशासनाने आज प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली.
आज सकाळी जेसीबी आणि बुलडोझरसह नगरपंचायतीचे पथक घटनास्थळी दाखल झाले. माजी जिल्हा परिषद अध्यक्षांची इमारत असल्याने तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. काही तासांतच या इमारतीचे बांधकाम जमीनदोस्त करण्यास सुरुवात झाली.
राजकीय सूडबुद्धीची चर्चा?
अजय कंकडालवार हे गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेसचे मोठे नाव आहेत. त्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही भूषवले आहे. त्यामुळेच, ऐन जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या धामधुमीत आणि राजकीय अस्थिरतेच्या काळात झालेली ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असल्याची चर्चा अहेरीमध्ये रंगली आहे. मात्र, नगरपंचायत प्रशासनाने ही कारवाई पूर्णपणे कायदेशीर प्रक्रियेचा भाग असल्याचे स्पष्ट केले आहे परंतू अन्य बेकायदेशीर इमारती सुद्धा आहेत त्यावर अशिच कारवाई होणार काय अशीही चर्चा जनमानसात सुरू आहे.

