रा. से. यो. स्वयंसेवकांनी समाजसेवेला आपल्या जीवनाचा भाग बनवावा - माजी आ. दिपकदादा आत्राम
आलापल्ली (अशोक खंडारे):- स्व. लक्ष्मीबाई महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप रविवार, दि. ०१ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहात पार पडला. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. दिपकदादा आश्राम,माजी आमदार तथा अध्यक्ष स्व. श्री.मल्लाजी आत्राम बहुद्देशीय संस्था, आलापल्ली हे होते. यावेळी प्रमुख अतिथी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. नितेश बोरकर, प्रमुख पाहुणे मा. श्री. संजय गोविंदवार, मुख्याध्यापक, विनोबा आश्रम शाळा तलवाडा, मा. श्री.निलेश वेलादी सरपंच ग्रामपंचायत मेडपल्ली, निरंजना वेलादी, सदस्य ग्रामपंचायत मेडपल्ली तथा गावातील प्रतिष्ठीत नागरिक आणि समस्त प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समारोप कार्यक्रमात शिबिरादरम्यान घेण्यात आलेल्या सर्व उद्बोधन सत्राचा आढावा घेण्यात आला. शिबिराच्या काळात तंबाखूजन्य पदार्थांचे दुष्परिणाम या विषयावर मा. नंदिनी आशा व मा. पूजा येल्लोरक यांनी मार्गदर्शन केले. योगनृत्य व आरोग्य या विषयावर मा. लैजा चालुरकर यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य व साक्षरतेचे महत्त्व पटवून दिले. तसेच ग्रामीण भागातील व्यसनाधिनतेच्या समस्या व उपाय या विषयावर प्रा. आनंद अलोने यांनी प्रभावी उद्बोधन केले.
मान्यवरांच्या हस्ते 100 झाडांचे वृक्षारोपण मौजा तलवाडा येथे करण्यात आले. शिबिरादरम्यान स्वयंसेवकांनी श्रमदान, स्वच्छता मोहीम, बौद्धिक सत्रे, मैदानी खेळ व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. या सर्व उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, शिस्त, संघभावना व नेतृत्वगुण विकसित झाल्याचे मान्यवरांनी नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात मा.दिपकदादा आत्राम यांनी NSS च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी समाजसेवेला जीवनाचा भाग बनवावा, असे आवाहन केले. महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य मा. डॉ. नितेश बोरकर यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल NSS कार्यक्रम अधिकारी, स्वयंसेवक व ग्रामस्थांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी स्वयंसेवकांना प्रमाणपत्रांचे वितरण करून आभार प्रदर्शन करण्यात आले. ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे हे विशेष शिबिर यशस्वी ठरल्याचे कार्यक्रम अधिकारी प्रा. यामिनी बोदलकर तसेच सह कार्यक्रम अधिकारी प्रा. खाडे सर यांनी सांगितले.शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रा. रामटेके, प्रा. बारसागडे, प्रा. कोहपरे प्रा. पाल, प्रा. चापले, प्रा. पारखी प्रा. चेडे व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

