BLO भत्ता वर्ग-3 कर्मचाऱ्यांना; प्रत्यक्ष काम मात्र ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून

0
BLO भत्ता वर्ग-3 कर्मचाऱ्यांना; प्रत्यक्ष काम मात्र ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून?



आष्टी:-
 निवडणूक आयोगाच्या नव्या व्यवस्थेनुसार वर्ग-3 कर्मचाऱ्यांची बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांना वार्षिक ₹12,000 इतका भत्ता मंजूर करण्यात आला आहे. मात्र, यापूर्वी BLO म्हणून कार्यरत असलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना आता BLO सहाय्यक म्हणून नियुक्त करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात निवडणूक विषयक कामे विनामोबदला करून घेतली जात असल्याने ग्रा. प. कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे.

माहितीनुसार, ग्रामपंचायत कर्मचारी यापूर्वी BLO म्हणून कार्यरत असताना त्यांना वार्षिक ₹6,000 इतका भत्ता मिळत होता. नव्या आदेशानंतर वर्ग-3 कर्मचाऱ्यांना BLO पदाची जबाबदारी व ₹12,000 वार्षिक भत्ता देण्यात आला असला तरी मतदार यादी पडताळणी, घरभेटी, SIR सर्वेक्षण, अर्ज संकलन व माहिती अद्ययावत करणे यांसारखी प्रत्यक्ष क्षेत्रीय कामे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडूनच करून घेतली जात असल्याचे सांगितले जात आहे.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, ते आधीच ग्रामपंचायतीतील पाणीपुरवठा, स्वच्छता, कर वसुली, जन्म-मृत्यू नोंदणी, ग्रामसभा, शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी व ऑनलाइन सेवा यांसारखी महत्त्वाची कामे सांभाळत आहेत. अशा परिस्थितीत अतिरिक्त निवडणूक कामे कोणत्याही स्वतंत्र मोबदल्याशिवाय देणे अन्यायकारक असल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये आहे.

दरम्यान, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनाही निवडणूक विषयक अतिरिक्त कामांपासून मुक्त करावे किंवा अपरिहार्य परिस्थितीत योग्य मानधनासहच कामे द्यावीत, अशी मागणी पुढे येत आहे.

याबाबत संबंधित प्रशासनाने लक्ष घालून समान कामासाठी समान मोबदला या तत्त्वानुसार निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !