मार्कंडा (कं) बसस्थानक ते चपराळा अभयारण्य तपासणी नाका दरम्यान वाकलेल्या वृक्षाकडे वनविभागाचे दुर्लक्ष
जीवीतहानी झाल्यावरच येणार काय वनविभागाला जाग ?
आष्टी (अशोक खंडारे):-
आष्टी–आलापल्ली मुख्य मार्गावरील मार्कंडा (कं) फाट्यावरून घोटकडे जाणाऱ्या मार्गावर, मार्कंडा (कं) बसस्थानक ते चपराळा अभयारण्य तपासणी नाका या दरम्यान रस्त्यालगत असलेला सागवान जातीचा वृक्ष धोकादायक स्थितीत आला असून, कोणत्याही क्षणी तो रस्त्यावर कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
गेल्या आठ दिवसा अगोदर वादळी वाऱ्यामुळे हा सागवान वृक्ष रस्त्याच्या दिशेने वाकला आहे. सध्या हा वृक्ष शेजारील झाडाला वेढलेल्या वेलीच्या आधारामुळे उभा असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, वेलीचा आधार तुटल्यास हा वृक्ष थेट रस्त्यावर कोसळण्याची दाट शक्यता असून मोठी दुर्घटना घडू शकते.
विशेष म्हणजे या धोकादायक वृक्षाजवळच हाकेच्या अंतरावर चपराळा अभयारण्य तपासणी नाका तसेच प्रादेशिक वनविभागाचे कार्यालय आहे. तरीही अद्याप या वृक्षाबाबत कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. जीवीत हानी झाल्यावरच वनविभाग जागा होईल काय असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे
या मार्गावरून दररोज दुचाकी, चारचाकी, शालेय वाहने, प्रवासी आणि मालवाहू वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा होत असते. अशा परिस्थितीत वृक्ष कोसळल्यास वाहतूक विस्कळीत होण्याबरोबरच जीवितहानीचीही शक्यता नाकारता येत नाही.
स्थानिक नागरिक व वाहनधारकांनी वनविभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून धोकादायक वृक्ष हटवावा किंवा आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. अपघात घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी वेळेत प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे नागरिकांनी सांगितले.
सध्या या धोकादायक वृक्षामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाने याची गंभीर दखल घेत त्वरित कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

