मुधोली चेक नं २ येथील सर्वेक्षणासाठी गेलेल्या 'वरद फेरो'च्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी डांबले ग्रामपंचायतमधे
आष्टी (अशोक खंडारे):- पूर्वसूचना न देता ड्रोनच्या साहाय्याने सर्वेक्षण सुरू केल्याचा आरोप करीत गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील मुधोली चक क्र. २ येथे संतप्त ग्रामस्थांनी 'वरद फेरो अलॉयज'च्या तीन अधिकाऱ्यांना काही काळ ग्रामपंचायत कार्यालयात डांबून ठेवले. ड्रोन कॅमेराचीही तोडफोड करण्यात आल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून या घटनेने प्रस्तावित पोलाद प्रकल्पावरील स्थानिकांचा तीव्र विरोध पुन्हा दिसून आला आहे.
चामोर्शी तालुक्यातील मुधोली चक क्र. २ येथे प्रस्तावित असलेल्या 'वरद फेरो अलॉयज'च्या पोलाद प्रकल्पासाठी गुरुवारी सायंकाळी कंपनीचे तीन अधिकारी सर्वेक्षणासाठी गावात आले होते. ग्रामस्थांचा आरोप आहे की, ग्रामपंचायत किंवा स्थानिकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता अधिकाऱ्यांनी ड्रोनद्वारे सर्वेक्षण सुरू केले. यामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली.
सर्वेक्षणाबाबत जाब विचारण्यासाठी ग्रामस्थ अधिकाऱ्यांभोवती जमा झाले. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद झाला आणि त्याचे रूपांतर गोंधळात झाले.
संतप्त ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांच्या ताब्यातील ड्रोन कॅमेरा हिसकावून फोडला तसेच इतर साहित्याचीही नासधूस केली. त्यानंतर तिन्ही अधिकाऱ्यांना मारहाण करून काही काळ ग्रामपंचायत कार्यालयात डांबून ठेवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुधोली परिसरात प्रस्तावित पोलाद प्रकल्पाला स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांचा सुरुवातीपासून विरोध आहे. यापूर्वीही भूसंपादनाच्या विरोधात मुंडण आंदोलन, ठिय्या आंदोलन अशा विविध स्वरूपातील आंदोलने करण्यात आली होती.
गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी भूसंपादन प्रक्रिया दोन महिन्यांसाठी स्थगित ठेवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतरही कंपन्यांकडून सर्वेक्षण व इतर हालचाली सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करून वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला असून वरिष्ठ अधिकारी परिस्थिवर लक्ष ठेऊन आहेत. असे पोलीस विभागाचे म्हणणे आहे
मुधोली चक क्र. २ येथे एमआयडीसीमार्फत सुमारे ७८ हेक्ट जमिनीवर हा प्रकल्प प्रस्तावित असून त्याचा परिणाम
गणपूर, जयरामपूर, कोनसरी, सोमनपल्ली आणि हळदीमाल या गावांवर होणार आहे. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या जनसुनावणीतही स्थानिकांनी सुपीक शेतीची जमीन देण्यास स्पष्ट नकार देत प्रकल्प अन्यत्र हलविण्याची मागणी केली होती. मुधोलीतील ताज्या घटनेमुळे प्रस्तावित औद्योगिक प्रकल्पांबाबत स्थानिकांमधील असंतोष अधिक तीव्र झाल्याचे दिसून येत असून, पुढील काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने संवादाची भूमिका स्वीकारण्याची गरज व्यक्त होत आहे.

