लग्नाच्या स्वप्नांना काळाचा ग्रहण! भाड्याच्या खोलीत तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या
आलापल्लीतील हृदयद्रावक घटना; प्रेमसंबंध, ठरलेला विवाह आणि अचानक टोकाचे पाऊल, पोलिसांकडून सखोल तपास सुरू
अहेरी, प्रतिनिधी :
आलापल्ली येथे एका २६ वर्षीय तरुणीने भाड्याच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अहेरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्नेहा हिवराज कुमरे (वय २६, रा. मार्कंडा, ता. चामोर्शी, सध्या आलापल्ली) ही सुरजागड कंपनीच्या स्टॉक यार्डमध्ये एंट्री ऑपरेटर म्हणून कार्यरत होती. ती आलापल्ली येथे भावाच्या खोलीत राहत होती.
स्नेहाचे चंद्रपूर जिल्ह्यातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. दोन्ही कुटुंबीयांनी या नात्याला संमती देत लवकरच विवाह करण्याचाही निर्णय घेतला होता. सर्व काही सुरळीत सुरू असतानाच स्नेहाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने कुटुंबीयांसह परिचितांना मोठा धक्का बसला आहे.
बुधवारी रात्री सुमारे साडेदहा वाजण्याच्या सुमारास ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. घरमालकिणीने याबाबत तिच्या आईला माहिती दिल्यानंतर नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने तिला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.
या प्रकरणी मृत स्नेहाची आई शिला कुमरे यांच्या तक्रारीवरून अहेरी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रभारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत असून आत्महत्येमागील कारणांचा शोध घेतला जात आहे.

