नागभीड–मार्कंडादेव रेल्वेमार्गाचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे
गडचिरोली, प्रतिनिधी : गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या नागभीड–मार्कंडादेव नवीन रेल्वेमार्ग विस्ताराच्या मागणीची पंतप्रधान कार्यालयाने (PMO) दखल घेत संबंधित प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठविला आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या रेल्वे प्रकल्पाला गती मिळण्याची आशा निर्माण झाली असून जिल्ह्याच्या औद्योगिक, आर्थिक आणि पर्यटन विकासासाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
ही मागणी केंद्रीय अध्यक्ष श्रीमंत संतोष छबिलदास सुरपाम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सविस्तर निवेदनाद्वारे केली होती. नागपूर (इतवारी)–नागभीड ब्रॉडगेज रेल्वेमार्गाचे काम सुरू असताना त्याचा विस्तार गडचिरोली जिल्ह्यातील ऐतिहासिक, धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या मार्कंडादेव (ता. चामोर्शी) पर्यंत करण्यात यावा, अशी त्यांनी विनंती केली होती. या निवेदनाची गंभीर दखल घेत पंतप्रधान कार्यालयाने प्रस्ताव आवश्यक कार्यवाहीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठविला आहे.
नागपूर–गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील वाढती वाहतूक आणि अपघातांचे प्रमाण लक्षात घेता पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि किफायतशीर वाहतुकीसाठी रेल्वेमार्गाची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली आहे. रेल्वेमुळे रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होऊन नागरिकांना अधिक सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल, असेही नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय, विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मार्कंडादेव येथील श्री मार्कंडेश्वर मंदिराला दरवर्षी लाखो भाविक भेट देतात. रेल्वे संपर्क उपलब्ध झाल्यास धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळेल. त्यामुळे स्थानिक व्यापार, हॉटेल व्यवसाय, वाहतूक सेवा, लघुउद्योग आणि पर्यटनाशी संबंधित व्यवसायांनाही मोठा लाभ होणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
भविष्यात या रेल्वेमार्गाचा विस्तार अहेरी, सिरोंचा तसेच तेलंगणा राज्यापर्यंत करण्याची क्षमता असल्याने दक्षिण गडचिरोलीच्या आर्थिक, औद्योगिक आणि सामाजिक विकासाला नवी दिशा मिळू शकते. या मार्गामुळे राज्यांमधील संपर्क अधिक मजबूत होऊन व्यापार व दळणवळणालाही मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
पंतप्रधान कार्यालयाने प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविल्यानंतर आता या मार्गाचे सर्वेक्षण, तांत्रिक अभ्यास, आर्थिक व्यवहार्यता आणि पुढील प्रशासकीय प्रक्रिया लवकर सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील नागरिक, उद्योग क्षेत्र आणि विविध सामाजिक संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, नागभीड–मार्कंडादेव रेल्वेमार्ग गडचिरोलीच्या विकासाचा नवा अध्याय ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

