'विकास' कागदावरच; गोटाटोल्यात गर्भवतीची दीड किमी स्ट्रेचरवरून जीवघेणी फरफट!

0
'विकास' कागदावरच; गोटाटोल्यात गर्भवतीची दीड किमी स्ट्रेचरवरून जीवघेणी फरफट!

रस्ता नसल्याने रुग्णवाहिका गावात पोहोचलीच नाही; एटापल्ली तालुक्यातील विदारक वास्तव पुन्हा उघड


एटापल्ली (गडचिरोली) | प्रतिनिधी :
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील गोटाटोला या दुर्गम गावात रस्ता नसल्यामुळे एका गर्भवती महिलेला तब्बल दीड किलोमीटर स्ट्रेचरवरून वाहून रुग्णवाहिकेपर्यंत नेण्याची वेळ ग्रामस्थांवर आली. या संतापजनक घटनेमुळे दुर्गम भागातील आरोग्य सुविधा आणि पायाभूत विकासाच्या दाव्यांचा फोलपणा पुन्हा एकदा समोर आला आहे.
प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने रुग्णवाहिकेला संपर्क केला. मात्र गावापर्यंत जाण्यासाठी वाहनयोग्य रस्ता नसल्याने रुग्णवाहिका गावात पोहोचू शकली नाही. अखेर ग्रामस्थांनी गर्भवती महिलेला स्ट्रेचरवर झोपवून खडतर आणि उबड-खाबड मार्गाने सुमारे दीड किलोमीटर अंतर पार केले. त्यानंतर तिला रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.
या घटनेने गडचिरोलीच्या दुर्गम भागातील नागरिक आजही मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याचे अधोरेखित झाले आहे. स्वातंत्र्याच्या अनेक दशकांनंतरही रस्ता, आरोग्य सेवा आणि आपत्कालीन सुविधा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालावा लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
गोटाटोला गावासह परिसरातील रस्त्यांचे काम तातडीने पूर्ण करून आरोग्य सेवा सक्षम कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अन्यथा अशा घटना पुन्हा घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !