रेतीघाटावर सापडला क्लिनरचा मृतदेह, ट्रक चालक संशयाच्या भोवऱ्यात
प्रतिनिधी | धानोरा
धानोरा तालुक्यातील राजोली रेती स्टॉक पॉईंट परिसरातील एका झुडपात क्लिचा मृतदेह आढळला असल्याने ट्रक चालक संशयाच्या भोवऱ्यात सापडला असल्याचे बोलले जात आहे हि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेतालगतच्या झुडपात १८ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. या प्रकरणातील संशयित चालक फरार झाला असून त्याचा कसून शोध सुरू आहे.
मृत युवकाची ओळख मार्केश सुनील मेश्राम (वय १८, रा. उमरेड) अशी झाली आहे. तर या घटनेतील संशयित चालक विशाल प्रदीप महाकाळकर (रा. नागपूर) हा घटनास्थळावरून पसार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, नागपूर येथून एमएच-४० सीटी-७७०० क्रमांकाचा टिप्पर रेती भरण्यासाठी राजोली रेती स्टॉक पॉईंटवर आला होता. यावेळी टिप्पर चालक आणि क्लिनर मार्केश मेश्राम यांच्यात काही कारणावरून शाब्दिक वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की त्याचे रूपांतर थेट हत्येत झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
बुधवारी (१५ जुलै) सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास राजोली परिसरातील शेतालगतच्या झुडपात युवकाचा मृतदेह आढळून आला. शेतकऱ्यांनी ही माहिती तत्काळ धानोरा पोलिसांना दिली. सहाय्यक पोलिस निरीक्षकांसह पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.
तपासादरम्यान रेती स्टॉक पॉईंटवरील संबंधित व्यक्तींची चौकशी करण्यात आली. त्यातून चालक व मृत युवकामध्ये वाद झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी संशयित चालकाविरुद्ध तपासाची दिशा निश्चित केली असून तो फरार असल्याने त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
या हत्येने धानोरा तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून रेती व्यवसायातील वाद पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू असून आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

