"गडचिरोली जिल्ह्यातील फसवी दारुबंदी उठवण्याची मागणी; धर्मरावबाबा आत्राम यांच्या भूमिकेला वडेट्टीवारांचा पाठिंबा

0

"गडचिरोली जिल्ह्यातील फसवी दारुबंदी उठवण्याची मागणी; धर्मरावबाबा आत्राम यांच्या भूमिकेला वडेट्टीवारांचा पाठिंबा"



४० वर्षांच्या दारुबंदीवर पुन्हा प्रश्नचिन्ह; आदिवासी संस्कृती, रोजगार आणि वास्तव परिस्थितीचा मुद्दा ऐरणीवर




गडचिरोली :-
गडचिरोली जिल्ह्यात गेल्या चार दशकांपासून लागू असलेल्या दारुबंदीच्या धोरणावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी गडचिरोली जिल्ह्यातील दारुबंदी उठवण्याची जोरदार मागणी केली असून, यासंदर्भात ते लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही या मागणीला उघड पाठिंबा दिल्याने राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला पेव फुटले आहे.
पुणे जिल्ह्यात विषारी दारू प्राशनामुळे वीसपेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यभरात दारुबंदी आणि अवैध मद्यविक्रीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर धर्मरावबाबा आत्राम यांनी गडचिरोली जिल्ह्यातील  दारुबंदीचे धोरण अपयशी ठरल्याचा दावा केला आहे.
आत्राम म्हणाले की, "गडचिरोली जिल्ह्यात गेल्या ४० वर्षांपासून दारुबंदी लागू आहे. मात्र, या बंदीमुळे अपेक्षित परिणाम साध्य झालेले नाहीत. आजही जिल्ह्यात विविध मार्गांनी दारूची जस्ट व विक्री सुरू आहे. दारुबंदी असूनही मद्यप्राशन थांबलेले नाही. त्यामुळे वास्तव परिस्थिती लक्षात घेऊन या धोरणाचा पुनर्विचार करण्याची गरज आहे."
त्यांनी पुढे सांगितले की, "गडचिरोली जिल्ह्यात आता मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे येत आहेत. रोजगारनिर्मिती वाढत आहे. विकासाच्या नव्या वाटा खुल्या होत असताना दारुबंदी कायम ठेवून कोणताही ठोस फायदा होत नाही. उलट गरीब आदिवासींना महागडी आणि अवैध दारू खरेदी करावी लागते."
आदिवासी संस्कृतीचा उल्लेख करताना आत्राम यांनी मोहफुलापासून तयार होणाऱ्या पारंपरिक दारूला कायदेशीर मान्यता देण्याची मागणी केली. "आदिवासी समाजात जन्म, विवाह, मृत्यू आणि विविध पारंपरिक धार्मिक विधींमध्ये मोहाची दारू सांस्कृतिक परंपरेचा भाग आहे. त्यामुळे या पारंपरिक पेयाला कायदेशीर मान्यता मिळावी," असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनीही आत्राम यांच्या भूमिकेला समर्थन दिले आहे. "मी स्वतः चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठविण्याच्या प्रक्रियेत भूमिका बजावली होती. जगातील अनेक देशांमध्ये आणि भारतातील बहुतांश राज्यांमध्ये दारू विक्री सुरू आहे. ज्या राज्यांनी दारुबंदी लागू केली होती, त्यांनाही नंतर ती उठवावी लागली," असे वडेट्टीवार म्हणाले.
ते पुढे म्हणाले, "दारुबंदी लादल्याने लोक व्यसनमुक्त होतात हा समज चुकीचा आहे. व्यसनमुक्तीसाठी जनजागृती, शिक्षण आणि सामाजिक उपाययोजना आवश्यक आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींना मोहफुलापासून पारंपरिक पद्धतीने दारू तयार करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे दारुबंदीच्या नावाखाली वास्तवापासून दूर असलेली चर्चा करण्यापेक्षा परिस्थितीचा व्यावहारिक विचार करणे गरजेचे आहे."
गडचिरोलीतील दारुबंदी उठवण्याच्या मागणीला आता राजकीय पाठबळ मिळू लागल्याने राज्य सरकार याबाबत कोणती भूमिका घेते, याकडे जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आगामी काळात या विषयावर व्यापक राजकीय आणि सामाजिक चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !