आष्टी परिसरात अवैध दारूचा सुळसुळाट; पुणे दुर्घटनेनंतर कारवाईची तिव्र मागणी

0
आष्टी परिसरात अवैध दारूचा सुळसुळाट; पुणे दुर्घटनेनंतर कारवाईची तिव्र मागणी 

"दारूबंदी केवळ कागदावरच का?" — नागरिकांचा संतप्त सवाल


आष्टी (अशोक खंडारे): - पुणे जिल्ह्यातील विषारी दारू दुर्घटनेत अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यभर अवैध दारूविरोधात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक एक्शन मोडवर आले असताना चामोर्शी तालुक्यातील आष्टी पोलीस स्टेशन चे अंतर्गत  परिसरातील बऱ्याच गावात सुरू असलेल्या कथित अवैध दारू विक्री व हातभट्टी व्यवसायाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

गडचिरोली हा दारूबंदी असलेला जिल्हा असतानाही आष्टी व परिसरातील काही गावांमध्ये अवैध दारू विक्री सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, काही ठिकाणी खुलेआम हातभट्टी दारूची निर्मिती व विक्री होत असून त्यामुळे तरुण पिढी व्यसनाधीनतेच्या विळख्यात अडकत आहे.

पुण्यातील दुर्घटनेने नागरिकांच्या चिंतेत आणखी भर टाकली आहे. विषारी दारूमुळे जीवितहानी होण्याची शक्यता लक्षात घेता पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त विशेष मोहीम राबवून अवैध दारू अड्ड्यांवर धडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात जर अवैध दारू सहज उपलब्ध होत असेल तर संबंधित यंत्रणांनी अधिक सतर्क होण्याची गरज आहे. अवैध दारू विक्री करणाऱ्यांसह त्यांना पाठबळ देणाऱ्या घटकांवरही कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सामाजिक कार्यकर्त्यांनीही या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष वेधले असून, गावोगावी जनजागृती मोहिमा राबविण्यासोबतच नियमित छापेमारी करून अवैध दारू व्यवसाय पूर्णपणे बंद करण्याची मागणी केली आहे.

पुण्यातील विषारी दारू दुर्घटना हा प्रशासनासाठी धोक्याचा इशारा असून, अशा प्रकारची घटना गडचिरोली जिल्ह्यात घडू नये यासाठी आष्टी परिसरातील अवैध दारू व्यवसायावर तातडीने कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !