जंगली हत्तींचा कळप साखरा येथील वैणगंगा नदीपात्रात दाखल जलविहार करतानांचे व्हिडिओ व्हायरल
शेतपिकांचे मोठे नुकसान; वनविभाग सतर्क, नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन
गडचिरोली :
दिभणा जंगल परिसरातून जंगली हत्तींचा कळप साखरा येथील वैनगंगा नदीपात्रात दाखल झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील पंधरवड्यापासून जंगल परिसरात वावरणारा हा कळप आता पोर्ला वनपरिक्षेत्र ओलांडून गडचिरोली-आरमोरी राष्ट्रीय महामार्ग पार करत गोगाव परिसरातून साखरा वैणगंगा नदीपात्रात पोहोचल्याचे समोर आले आहे.
वैणगंगा नदीत हत्तींचा कळप मनमुरादपणे जलविहार करतानाचे दृश्य नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद केले असून, हे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. नदीपात्रात लहान पिल्लांसह हत्ती पाण्यात खेळताना दिसत असल्याने अनेक नागरिकांनी नदीकाठावर मोठी गर्दी केली होती.
दरम्यान, या हत्तींच्या कळपाने परिसरातील धान, भाजीपाला आणि इतर शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याची माहिती समोर आली आहे. वाढत्या उष्णतेमुळे पाण्याच्या शोधात हत्ती मानवी वस्तीकडे वळत असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.
वनविभागाचे पथक सतत कळपावर नजर ठेवून असून, नागरिकांनी हत्तींच्या जवळ जाण्याचा किंवा फोटो-व्हिडिओ काढण्यासाठी जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. हत्ती चिडल्यास जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
विशेष म्हणजे, हा कळप राष्ट्रीय महामार्ग ओलांडून वैणगंगा नदीपात्रात दाखल झाल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत नागरिकांना सुरक्षित अंतर राखण्याच्या सूचना दिल्या.
“हत्तींच्या कळपामुळे वनक्षेत्रासह शेतकरीही धास्तावले; वनविभागाकडून सतत पाहणी सुरू” आहे

