तेंदूपत्ता संकलन करीत असतांनाच वाघाने हल्ला करून चार महिलांना केले ठार

0
तेंदूपत्ता संकलन करीत असतांनाच वाघाने हल्ला करून चार महिलांना केले  ठार 

गुंजेवाही जंगल परिसरातील थरारक घटना; गावात भीतीचे वातावरण


चंद्रपूर / सिंदेवाही, दि. २२ : सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगल परिसरात शुक्रवारी सकाळी घडलेल्या भीषण घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेलेल्या महिलांवर अचानक वाघिणीने हल्ला चढविल्याने चार महिलांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुंजेवाही परिसरातील काही महिला सकाळच्या सुमारास जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेल्या होत्या. जंगलात तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरू असतानाच दबा धरून बसलेल्या वाघिणीने अचानक महिलांवर हल्ला केला. या अचानक झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे महिलांमध्ये एकच गोंधळ उडाला. जीव वाचविण्यासाठी महिला सैरावैरा पळू लागल्या. मात्र, वाघिणीच्या हल्ल्यात चार महिलांचा जागीच मृत्यू झाला.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका महिलेने कसाबसा जीव वाचवत गाव गाठले. तिने आरडाओरडा करत ग्रामस्थांना संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी तातडीने जंगल परिसरात धाव घेतली. तेव्हा घटनास्थळी चार महिलांचे मृतदेह आढळून आल्याने गावात शोककळा पसरली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. तसेच परिसरात अतिरिक्त पथके तैनात करण्यात आली असून नागरिकांनी जंगलात जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !