आष्टीत शिवभोजन थाळीचा रेट अधिक
दहा रुपयांच्या जेवणासाठी अधिक पैसे घेत असल्याची चर्चा; नागरिकांत संताप, चौकशीची मागणी
आष्टी (अशोक खंडारे) वैनगंगा वार्ता १९
गोरगरीब, श्रमिक व गरजू नागरिकांना अल्प दरात पौष्टिक अन्न उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या शिवभोजन योजनेबाबत आष्टी शहरात गंभीर चर्चा रंगू लागली आहे. शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक रक्कम आष्टी केंन्दावर आकारली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत असून, यामुळे सर्वसामान्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत केवळ दहा रुपयांत भोजन उपलब्ध करून देण्याची तरतूद असताना, आष्टी केंद्रांवर नागरिकांकडून अधिक पैसे घेतले जात असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. विशेषतः मजूर, रुग्णांचे नातेवाईक, प्रवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांना याचा फटका बसत असल्याचे बोलले जात आहे.
काही नागरिकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “शासन गरीबांसाठी योजना राबवत आहे; मात्र प्रत्यक्षात आष्टी या ठिकाणी नियम धाब्यावर बसवले जात आहेत. गरीब माणसाकडून अतिरिक्त पैसे घेणे अन्यायकारक आहे.”
दरम्यान, या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाने अचानक तपासणी मोहीम राबवून वास्तव समोर आणावे, तसेच शिवभोजन केंद्रांवर दरफलक स्पष्टपणे लावण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणीही पुढे येत आहे.
याबाबत संबंधित विभागाकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नसली, तरी शहरात सुरू असलेल्या चर्चेमुळे शिवभोजन योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. गरीबांच्या ताटातील घासावर कुणी डल्ला मारत असेल, तर प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करावा, अशी भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.

