गडचिरोली-चंद्रपूर महामार्गावर लागली ई बसला आग बालबाल बचावले प्रवाशी

0
गडचिरोली-चंद्रपूर महामार्गावर लागली ई बसला आग बालबाल बचावले प्रवाशी 

काही मिनिटांत इलेक्ट्रिक बस जळून खाक

बसच्या खालून धूर निघताच चालक सतर्क; मोठी दुर्घटना थोडक्यात टळली



चंद्रपूर/गडचिरोली : गडचिरोलीवरून चंद्रपूरच्या दिशेने जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) एका इलेक्ट्रिक बसला शुक्रवार दि  ८ मे ला दुपारच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. चंद्रपूर-गडचिरोली महामार्गावरील घंटा चौकीजवळ हा थरार घडला. मात्र बस चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे बसमधील सर्व २७ प्रवाशांचे प्राण वाचले असून मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही इलेक्ट्रिक बस २७ प्रवाशांना घेऊन गडचिरोलीवरून चंद्रपूरकडे निघाली होती. प्रवास सुरू असताना घंटा चौकी परिसरात बसच्या खालच्या भागातून अचानक धूर निघू लागला. धुराचे लोट दिसताच चालकाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखले आणि कोणताही धोका न पत्करता तातडीने बस रस्त्याच्या कडेला उभी केली.
यानंतर चालकाने तत्काळ सर्व प्रवाशांना बसमधून खाली उतरण्याच्या सूचना दिल्या. प्रवासी सुखरूप बाहेर पडताच काही मिनिटांतच बसने पेट घेतला आणि आगीने रौद्र रूप धारण केले. पाहता पाहता संपूर्ण इलेक्ट्रिक बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आगीचे लोळ आणि धुराचे प्रचंड लोट दूरवरून दिसत होते. या भीषण आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहतूक नियंत्रित केली. तसेच अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक विस्कळीत झाली होती.
दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप कारण व  स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किट किंवा इलेक्ट्रिक बसच्या बॅटरीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलीस तसेच एसटी महामंडळाच्या तांत्रिक विभागाकडून घटनेचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.
या घटनेनंतर इलेक्ट्रिक बसमधील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अशा वाहनांच्या तांत्रिक तपासणी आणि सुरक्षाविषयक उपाययोजनांबाबत  जनमानसात चर्चा सुरू झाली आहे. अश्या प्रकारच्या बसेस जर सुरू राहणार असतील तर ई बसमधून प्रवास कसा करावा असा प्रश्न उपस्थित होत आहे
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !