लग्न समारंभात ‘हिडमा’वरील गाणे वाजवल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा,
एटापल्ली पोलिसांची कारवाई
एटापल्ली : तालुक्यातील मौजा कृष्णार येथे लग्न समारंभात नक्षलवादी संघटनेशी संबंधित ‘हिडमा’वरील गाणे डीजेवर वाजवल्याप्रकरणी एटापल्ली पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ७ मे २०२६ रोजी पोलीस शिपाई रोशन कान्हुजी पुराम यांच्या मोबाईलवर सोशल मीडियाद्वारे सीपीआय माओवादी संघटनेच्या पीपल्स गोरिला लिबरेशन आर्मीच्या बटालियन क्रमांक १ चा कमांडर हिडमा माडवी याच्यावर आधारित गाण्याचा व्हिडीओ क्लिप प्राप्त झाला. सदर व्हिडीओमध्ये “हमारे हक की जंग है हिडमा…” अशा आशयाचे गाणे वाजत असून त्यावर युवक-युवती नृत्य करताना दिसत होते.
या प्रकरणाची खात्री केली असता, मौजा कृष्णार येथील माधव वड्डे यांच्या सांधवाडीत संदिप बाजीराव हिचामी यांच्या लग्नानिमित्त पारंपरिक आदिवासी नृत्याचा कार्यक्रम सुरू असल्याचे निष्पन्न झाले. कार्यक्रमात शंकर हिचामी यांच्या मालकीचा डीजे लावण्यात आला होता.
दरम्यान, बाबुराव कांदो यांनी “पोलीस आदिवासी गावात कोणाच्या परवानगीने आले, नक्षलवादीच चांगले होते” असे वक्तव्य करत हिडमाचे गाणे लावण्याची मागणी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर चैतू रुषी तेलामी याने स्वतःकडे संबंधित गाणे असल्याचे सांगून ते डीजे ऑपरेटर आर्यन हिचामी व शरद कांदो यांना दिले. ऑपरेटरांनी सदर गाणे डीजेवर वाजविल्याने भारताची सार्वभौमता, एकात्मता व अखंडता धोक्यात आणण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
या प्रकरणी एटापल्ली पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक ८०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १९७(१)(ड), ३५३(१)(ब), २२३, ३(५) तसेच मुंबई पोलीस अधिनियम कलम ११२, ११७, ३७(१)(३)/१३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यात शंकर हिचामी (वय ४०), बाबुराव कांदो (वय ३५), चैतू रुषी तेलामी (वय २५), आर्यन हिचामी (वय २४) व शरद कांदो (वय २३), सर्व रा. कृष्णार, ता. एटापल्ली यांचा समावेश आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रतिक्षा वणवे करीत असून, पोलीस निरीक्षक मच्छिंद्र नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरू आहे.

