१ मे विदर्भासाठी काळा दिवस; गडचिरोलीत स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठी जोरदार आंदोलन
गडचिरोली (अशोक खंडारे): विदर्भ राज्य आंदोलन समिती जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने १ मे हा विदर्भाच्या जनतेसाठी काळा दिवस असल्याचे घोषित करत स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी शहरातील इंदिरा गांधी चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी गेल्या १२० वर्षांपासून सातत्याने होत आहे. विविध आयोगांनी विदर्भ राज्य निर्मितीची शिफारस करूनही १ मे १९६० रोजी विदर्भाला महाराष्ट्रात सामील करण्यात आले. नागपूर करारातून विदर्भासाठी अनेक आश्वासने देण्यात आली होती, मात्र आजपर्यंत त्यांची पूर्तता झालेली नाही.
यामुळे सिंचन, आरोग्य, रस्ते, उद्योग व शिक्षण क्षेत्रात विदर्भावर मोठा अनुशेष निर्माण झाला असून युवकांना रोजगारासाठी बाहेर जावे लागत आहे. विदर्भात सर्वाधिक वीज निर्मिती होत असतानाही लोडशेडिंगची समस्या कायम असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
समितीने केंद्र सरकारने तात्काळ स्वतंत्र विदर्भ राज्य घोषित करावे, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, अन्नधान्यावरचा जीएसटी रद्द करावा, शेतजमिनी अधिग्रहित करताना योग्य बाजारभाव द्यावा, भूमिहीन शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासकीय नोकरी द्यावी, गडचिरोलीत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करावे, सुरजागड-कोनसरी उद्योगात स्थानिकांना रोजगार द्यावा, रानटी हत्तींचा बंदोबस्त करावा, सर्पदंश मृतांना मदत द्यावी तसेच ग्रामीण भागातील लोडशेडिंग बंद करून २४ तास वीजपुरवठा करावा, अशा प्रमुख मागण्या मांडल्या.
या आंदोलनात जिल्हा समन्वयक अरुण पाटील मुनघाटे, दक्षिण जिल्हाध्यक्ष अशोक पोरेड्डीवार, शहराध्यक्ष रमेश भुरसे, सुनील पोरेड्डीवार, गोवर्धन चव्हाण, मोतीराम लाटेलवार, विलास रापर्तीवार, गुरुदेव भोपये, प्रकाश ताकसांडे, गुलाबराव मडावी आदी उपस्थित होते.

