आष्टी येथील “दिव्यांग व्यक्ती रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्यात संघटनेची बांधणी”
आष्टी (अशोक खंडारे):- चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहामध्ये “दिव्यांग व्यक्ती रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळाव्यात संघटनेची बांधणी करण्यात आली. प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचा अतिशय नवीन क्षेत्र, प्रकल्प कामांत आणण्याच्या दृष्टीने आणि वातावरण निर्मिती करण्याच्या दृष्टीने हा मेळावा आयोजित केला होता. मेळावा यशस्वीरित्या आयोजित करण्यात आला नि संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. बेबीताई बुरांडे. तर प्रमुख अतिथी उपसरपंच. सौ. रेशमा ताई फुलझेले, ग्रामविकास अधिकारी, मा. कार्तिक बोगा, आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री जगताप, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुरज कुकुडकर,पशुधन तज्ञ डॉ. नरेश कांबळे, प्रकल्प समन्वयक प्रितम नानवटे आदी मान्यवर उपस्थिती होते
कार्यक्रमासाठी मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रकल्प व्यवस्थापक संगीता तुमडे यांनी दिव्यांग लाभार्थी यांचे हक्क आणि अधिकार, कायदे, दिव्यांग व्यक्तींसाठी आलेला शासकीय स्तरावरील योजना, 27 मार्च 2026 रोजी चा तात्पुरते दिव्यांग प्रमाणपत्र असलेल्या दिव्यांग लाभार्थी यांचे मानधन बंद होणारा शासन निर्णय त्यामुळे त्यांचे मानधन बंद होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आणणारा शासन निर्णय रद्द व्हावा किंवा त्यात दुरुस्ती व्हावी म्हणून संघटनेचे पदाधिकारी व संघटना कार्यकर्ते मिळून जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, खासदार–आमदार सोबत पालकमंत्री आणि सहपालकमंत्री यांच्या अंतर्गत महामहीम राज्यपाल, मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आलेले आहे.
शासन दिव्यांग व्यक्तीसाठी योजना बनवितो पण त्या योजना मिळविण्यासाठी खूप मोठ्या अटी असतात त्या पूर्ण करू न शकणाऱ्या असतात त्या पूर्ण करण्यासाठी किती तरी वेळा शासनाचे उंबरठे झिजवावे लागतात. दिव्यांग व्यक्तीला नाहक त्रास होतो आहे. दुर्मिळ व्यंगत्वामुळे दिव्यांग व्यक्ती शासन स्तरा पर्यंत पोहचत नाहीत त्यामुळे दिव्यांग व्यक्ती योजनेपासून वंचित राहतात, या सगळ्या मुळे दिव्यांग व्यक्तीचा विकास व्हावा तसा होत नाही. दिव्यांग व्यक्ती आणि दिव्यांग महिला आणि दिव्यांग एकल महिलांवर होणाऱ्या हिंसा समाजाकडून, शासन यंत्रणेकडून आणि कुटुंबाकडून असा सगळ्या विळख्यात दिव्यांग अजूनही अडकला आहे.
सद्याची ज्वलंत समस्या, दिव्यांग व्यक्तीला कुटुंबामध्ये होणारा मानसिक त्रास, आरोग्याचे प्रश्न, उपजीविकेचे प्रश्न, शिक्षण, दैनदिन जीवनाला लागणाऱ्या संसाधांचा अभाव असे अनेक मुद्दे हाताळत मार्गदर्शन करण्यात आले. पशुधन तज्ञ डॉ. नरेश कांबळे यांनी दिव्यांग व्यक्तींना शेळीपालन, कुक्कुटपालन, पशुपालन व्यवसायाच्या विविध संधींबाबत सविस्तर माहिती दिली. प्रकल्प समन्वयक प्रितम नानवटे यांनी दिव्यांगांना असणाऱ्या विविध प्रकारच्या योजना, सोई सुविधा, अर्जुन पोर्टल, E रिक्षा, KYC, संजय गांधी निराधार योजना, घरकुल, विवाह प्रोत्साहन योजना, सेस फंड मधून अर्थसहाय्य योजना, 18 ते 35 वयोगटातील SHI, SS सिकलसेल अस्थिव्यंग लाभार्थी यांचे ऑनलाईन आणि ऑफलाईन प्रशिक्षण, बचत गट, संघटना बांधणीचे महत्त्व, स्वयंरोजगाराच्या संधी इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले, या मेळाव्याला प्रमुख पाहुण्या म्हणून पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री जगताप यांनी दिव्यांग व्यक्तींना आत्मनिर्भर होण्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. दिव्यांग व्यक्तींनी स्वतःच्या दिव्यांगत्वाचा बाऊ न करता आत्मसन्मानाने जीवन जगावे. संस्थेमार्फत बऱ्याच योजना आहेत त्यांचा लाभ घेऊन आर्थिक सुबकता साधावी, सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगतातून दिव्यांग व्यक्तींनी एकत्रित येऊन संघटीत व्हावे, संघटनात्मक पद्धतीने कार्य करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमात उपस्थित दिव्यांग बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी, शासनाच्या योजना आणि संघटना उभारणीबाबत उपयुक्त मार्गदर्शन मिळाले. सदर कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन उत्तम प्रकारे पार पडले असून, सर्व मान्यवर व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सूत्र संचालन राजू कुमरे यांनी केले. प्रस्तावना गोपीनाथ कोवे यांनी तर आभार प्रदर्शन संघटनेचे सचिव श्रीकांत उंदीरवाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजन आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था कुरखेडा व वैनगंगा दिव्यांग संघटना आष्टी चे दिलीप चतुर, गोपीनाथ डोर्लीकर, कोंडू बावणे यांनी सहकार्य केले.
मेळाव्याच्या अनुषंगाने काय दृष्टीस पडले, या मेळाव्यात दिव्यांग व्यक्तीची माहितीचा प्रचार-प्रसार व्हावा म्हणून माहिती पत्रक वितरीत करण्यात आले. मेळाव्याच्या माध्यामतून असे लक्षात आले कि बऱ्याच लोकांकडे पूर्वी हाताने लिहून प्रमाणपत्र द्यायचे तेच प्रमाणपत्र अजुनही चालवीत आहे. खरे खुरे लाभार्थी आहेत ज्यांना चालता येत नाही अशाना तात्पुरते प्रमाणपत्र देऊन योजनेपासून वंचित ठेवले आहे. यात वैद्यकीय अधिकारी यांची खूप मोठी गफलत दिसून आली. दिव्यांग व्यक्ती मूल्यमापन आणि चिकित्सा पद्धत चुकीची दिसून आली. काही लोकांचे व्हीडीओ आणि फोटो घेण्यात आले. शासन या गंभीर बाबीकडे कटाक्षाने बघणे आणि त्यावर काय उपाय योजना करता येईल यासाठी कार्यनियोजन करणे महत्वाचे आहे.

