मध्यरात्री पोलिसांचा धडाका! कुरखेड्यात हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर छापा; २२ जण ताब्यात, ७२ लाखांचा मुद्देमाल जप्त

0
मध्यरात्री पोलिसांचा धडाका! कुरखेड्यात हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर छापा; २२ जण ताब्यात, ७२ लाखांचा मुद्देमाल जप्त



१३ कार, ६ दुचाकी, २३ मोबाईल आणि रोख रक्कम जप्त; मुख्य आरोपी एजाज शेख उर्फ ‘कात्या’सह कारवाई

गडचिरोली | प्रतिनिधी
कुरखेडा तालुक्यातील खेडेगाव परिसरात सुरू असलेल्या हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखा आणि कुरखेडा पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत २२ जणांना ताब्यात घेण्यात आले असून सुमारे ७१ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच ८ जण घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. 
गुप्त माहितीवरून मध्यरात्री धाड
कुरखेडा येथील एजाज रफिक शेख उर्फ कात्या (४१) हा खेडेगाव परिसरात मोठा जुगार अड्डा चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक भगतसिंह दुल्हत आणि कुरखेडा पोलिस निरीक्षक महेंद्र वाघ यांच्या नेतृत्वात पोलिसांनी पहाटे सुमारे एक वाजताच्या सुमारास छापा टाकला. त्यावेळी काही जण पत्त्यांवर पैशांचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांना पाहताच काही जणांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. 
मुख्य आरोपीसह २२ जण ताब्यात
या कारवाईत मुख्य आरोपी एजाज शेखसह २२ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. घटनास्थळी झडती घेतली असता २ लाख ७५ हजार २०० रुपयांची रोख रक्कम आढळून आली. तसेच पत्त्यांचे संच, मोबाईल फोन, चारचाकी व दुचाकी वाहने असा मोठा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. 
१३ कार आणि ६ दुचाकी जप्त
छाप्यात पोलिसांनी
२३ मोबाईल फोन
१३ चारचाकी वाहने
६ मोटारसायकली
रोख रक्कम व जुगार साहित्य
असा एकूण ७१ लाख ८५ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक महेंद्र वाघ करत आहेत. 
अनेक दिवसांपासून सुरू होता जुगार
खेडेगाव-गेवर्धा परिसरात हा जुगार अड्डा अनेक दिवसांपासून सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. रात्री उशिरा महागड्या गाड्यांमधून अनेक जुगारप्रेमी येथे येत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. पोलिसांच्या या कारवाईनंतर परिसरात खळबळ उडाली असून इतक्या दिवसांपासून हा अड्डा सुरू कसा राहिला, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. 
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक एम. रमेश, उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा आणि कुरखेडा पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही धाड टाकून मोठे यश मिळवले.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !