गडचिरोलीचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांच्यावर गंभीर आरोप

0
गडचिरोलीचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांच्यावर गंभीर आरोप


डॉ. सुजिता वाडीवे यांना न्याय द्यावा – राष्ट्रीय मानवाधिकार संघटना महिला आघाडीचा इशारा

गडचिरोली, दि. 20 एप्रिल :
गडचिरोली जिल्ह्यातील विद्यमान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांच्या कार्यपद्धती व वर्तनाविषयी गंभीर स्वरूपाच्या तक्रारी समोर आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची तात्काळ व निष्पक्ष चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटना, महिला आघाडी (जिल्हा गडचिरोली) यांच्या वतीने करण्यात आली आहे.
संघटनेला प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार, प्रभारी जिल्हा हिवताप अधिकारी तसेच तालुका आरोग्य अधिकारी (कुरखेडा) म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. सुजिता वाडीवे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या तक्रारीत भ्रष्टाचारासाठी दबाव टाकणे, मानसिक छळ करणे, विनयभंग व लैंगिक छळ, जातीवाचक अपमान तसेच खोटी माहिती व बनावट कागदपत्रे सादर करण्यास भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे.
डॉ. वाडीवे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील हिवताप नियंत्रणासाठी कीटकनाशके, औषधे व प्रयोगशाळा साहित्य खरेदी प्रक्रिया पारदर्शक व नियमबद्ध पद्धतीने राबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिंदे यांनी सुरुवातीपासूनच विशिष्ट पुरवठादाराला लाभ मिळवून देण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच सतत फोन करून मानसिक त्रास देणे व धमक्या देण्याचाही उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे.
याबाबत डॉ. सुजिता वाडीवे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे रीतसर तक्रार दाखल करून सखोल चौकशी करून डॉ. प्रताप शिंदे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई व फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मात्र अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई न झाल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, राष्ट्रीय मानवाधिकार संघटना महिला आघाडीच्या वतीने या प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष व सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्याला पदावरून दूर करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
जर प्रशासनाने तात्काळ कारवाई केली नाही, तर हा मुद्दा राज्य मानवाधिकार आयोग व राज्य महिला आयोग तसेच न्यायालयाच्या निदर्शनास आणण्यात येईल. तसेच जिल्हा परिषदेसमोर लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.
यासंदर्भातील निवेदन राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा पाटणकर–म्हैसकर यांना सादर करण्यात आले. यावेळी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष मनीषा मडावी, कोषाध्यक्ष जाहेदा शेख, शहराध्यक्ष स्नेहा मेश्राम, शहर उपाध्यक्ष भूषणा खेडेकर व शहर सचिव राणी गोपशेट्टीवर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रीय मानवाधिकार संघटना महिला आघाडी (जिल्हा गडचिरोली) यांच्या वतीने संबंधित जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला पदावरून दूर करून निष्पक्ष चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !