महापुराने नाल्याकाठी पडलेला खड्डा बनला जीवघेणा; कढोली -जैरामपूर मार्गावरील नागरिक संतप्त

0
 महापुराने नाल्याकाठी पडलेला खड्डा बनला जीवघेणा; कढोली -जैरामपूर मार्गावरील नागरिक संतप्त


चार वर्षांपूर्वी पासून रस्ता धोक्यात तरीही प्रशासनाची डोळेझाक का?



आष्टी ,अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता १९:-
चामोर्शी तालुक्यातील कढोली-जैरामपूर मार्गावरील नाल्याच्या काठाला आलेल्या महापुरामुळे पडलेला मोठा खड्डा तब्बल चार वर्षांपासून कायम असूनही शासन व संबंधित विभागाकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही या गंभीर समस्येकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचा आरोप परिसरातील ग्रामस्थांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चार वर्षांपूर्वी आलेल्या महापुरामुळे नाल्याच्या काठावरील रस्त्याचा मोठा भाग खचला होता. त्यानंतर या ठिकाणी मोठा खड्डा निर्माण झाला. कालांतराने हा खड्डा अधिकच वाढत गेला असून पावसाळ्यात या ठिकाणी अपघात होण्याची भीती कायम निर्माण होते. दररोज या मार्गाने अनखोडा ,कढोली,रामपूर ,जैरामपूर,मुधोली येथून शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांची मोठी वर्दळ असते.
विशेष म्हणजे, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना अनेक वेळा याबाबत निवेदने देण्यात आली आहेत. मात्र प्रत्यक्ष दुरुस्तीचे काम अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी आणि मुसळधार पावसात समोरुन एखादे वाहण येत असताना डोळे दिपून या ठिकाणी अपघाताचा धोका अधिक वाढतो आहे.
स्थानिक ग्रामस्थांच्या मते, एखादी गंभीर दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. चार वर्षांपासून प्रलंबित असलेली ही समस्या तातडीने मार्गी लावून रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या धोकादायक ठिकाणाची त्वरित पाहणी करून संरक्षण भिंत उभारणे व रस्त्याची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !