आष्टीत उष्माघाताने विवाहित महिलेचा मृत्यु ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
आष्टी (अशोक खंडारे) – वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे आष्टी येथे उष्माघाताने एका विवाहित महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
राजेश्वरी नितेश मेश्राम (वय ३० वर्षे) रा.आष्टी तालुका चामोर्शी असे मृत महिलेचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून प्रखर उन्हामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांना उष्माघाताचा त्रास झाल्याने त्यांची प्रकृती अचानक बिघडली.
राजेश्वरी मेश्राम या घरगुती काम करत असताना अचानक अस्वस्थ झाल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या दुर्दैवी घटनेनंतर प्रशासनाने नागरिकांना दुपारच्या वेळेत घराबाहेर न पडण्याचे, पुरेसे पाणी पिण्याचे तसेच आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः शेतकरी, मजूर आणि बाहेर काम करणाऱ्या नागरिकांनी उन्हाच्या कडक झळांपासून स्वतःचे संरक्षण करावे, असेही सांगण्यात आले आहे.
दरम्यान, उष्माघाताच्या वाढत्या घटनांमुळे आरोग्य विभाग सतर्क झाला असून प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. नागरिकांनीही स्वतःची काळजी घेऊन कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

