बैल-बंडी, शिधा आणि कुटुंबासह हजारो शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन; जमीन अधिग्रहणाविरोधात एल्गार

0
बैल-बंडी, शिधा आणि कुटुंबासह हजारो शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन; जमीन अधिग्रहणाविरोधात एल्गार


अशोक खंडारे संपादक वैनगंगा वार्ता १९
गडचिरोली :-
गडचिरोली व चामोर्शी तालुक्यातील प्रस्तावित विमानतळ, एमआयडीसी आणि इतर विकास प्रकल्पांसाठी करण्यात येत असलेल्या जमीन अधिग्रहणाविरोधात गुरुवारी हजारो शेतकऱ्यांनी बैल-बंडी, कुटुंबीय आणि संपूर्ण शिधा-पाण्यासह दिनांक ४ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे धडक देत अभूतपूर्व ठिय्या आंदोलन सुरू केले. "जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही," असा निर्धार आंदोलक शेतकऱ्यांनी व्यक्त केला.
गडचिरोली तालुक्यातील हिरापूर, गुरुवळा, राखी आणि शिरपूरचक परिसरात प्रस्तावित विमानतळासाठी जमीन अधिग्रहण करण्याचा शासनाचा प्रस्ताव आहे. त्याचबरोबर चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील १४ गावांतील शेतजमिनी एमआयडीसीसाठी अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरू असून जयरामपूर परिसरातील आणखी १३ गावांतील जमिनी अधिग्रहित करण्यासंदर्भातही शासनाने आदेश जारी केले आहेत. या निर्णयांना स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.
या धोरणाच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी यापूर्वी जीआरची होळी, मुंडन आंदोलन, धरणे आंदोलन तसेच विविध निवेदने देऊन शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप शेतकरी संघर्ष कृती समितीने केला आहे.
शेतकऱ्यांनी केवळ जमीन अधिग्रहणाचाच नव्हे तर जिल्ह्यातील रानटी हत्तींच्या वाढत्या उपद्रवाचाही प्रश्न आंदोलनादरम्यान उपस्थित केला. गेल्या तीन-चार वर्षांपासून हत्तींच्या कळपांमुळे शेती, घरे आणि जनजीवन मोठ्या प्रमाणात प्रभावित होत असून अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. वारंवार मागणी करूनही प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना न केल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
शेतकरी संघर्ष कृती समितीचे नेते महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात हजारो शेतकरी, महिला, युवक आणि नागरिक सहभागी झाले आहेत. बैल-बंडी, जीवनावश्यक साहित्य आणि कुटुंबीयांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडल्याने आंदोलनाला ऐतिहासिक स्वरूप प्राप्त झाले आहे.
या आंदोलनाला विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था आणि समाज संघटनांचा मोठा पाठिंबा मिळाला आहे. काँग्रेस, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी, आझाद समाज पार्टी  तेली समाज, कुणबी समाज, कलार समाज, मुस्लिम समाज, डॉक्टर असोसिएशनसह अनेक संघटनांनी आंदोलनाला समर्थन दिले आहे.
आंदोलनात आमदार रामदास मसराम, शेतकरी नेते महेंद्र ब्राह्मणवाडे, डॉ. अनंता कुंभारे, दिवाकर निसार, अनिल कोठारे, सुनील कोहपरे, सुभाष कोठारे, रमेश मडावी, रामदास कुकुडकर, गुरुदास ठाकरे यांच्यासह अनेक शेतकरी नेते उपस्थित होते. तसेच काँग्रेस जिल्हाध्यक्ष विश्वजीत कोवासे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, आरपीआय नेते रोहिदास राऊत, शिवसेना नेते सुनील केदारी, वासुदेव शेडमाके, पवन गेडाम, कम्युनिस्ट पक्षाचे अमोल मारकवार, आझाद समाज पार्टी युवा जिल्हाध्यक्ष विवेक खोब्रागडे व नेते आणि विविध पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
दरम्यान, "सुपीक शेतजमिनी वाचवा, पर्यायी जागा निवडा" आणि "शेतकरी विरोधी जमीन अधिग्रहण रद्द करा" अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !