जामगिरी फाट्याजवळ ट्रक-कार भीषण अपघात; गडचिरोली वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यालय अधीक्षकाचा मृत्यू
अंत्यविधी आटोपून परतत असताना घटना; कारमधील तिघे कर्मचारी किरकोळ जखमी, ट्रक चालक ताब्यात
चामोर्शी (अशोक खंडारे):
चामोर्शी-आष्टी मार्गावरील जामगिरी फाट्याजवळ ट्रक आणि कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात गडचिरोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यालय अधीक्षक विनोद कुमरे (५७) यांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना मंगळवारी (दि.) दुपारी सुमारे १.३० वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात कारमधील इतर तीन कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, विनोद कुमरे (रा. दिघोरी, नागपूर) हे आपल्या सहकाऱ्यांसह एका अंत्यविधीचा कार्यक्रम आटोपून टाटा इंडिका कारने आष्टीकडून चामोर्शीकडे येत होते. दरम्यान जामगिरी फाट्याजवळ समोरून येणाऱ्या ट्रक (क्र. MH-34 BZ-1337) ने कारला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कार रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन आदळली.
या अपघातात कारच्या मागील सीटवर बसलेल्या कुमरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान कारमधील अमोल देशपांडे (४०), कुणाल मुळके (२८) आणि योगेश वरखडे (४०) हे किरकोळ जखमी झाले असून प्राथमिक उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
अपघातानंतर चामोर्शी पोलिसांनी संबंधित ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक दीपक डोंब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रमेश खोब्रागडे व पथक पुढील तपास करत आहेत.

