अनखोडा येथील दुचाकीस्वारांना भरधाव ट्रकने चिरडले,पती-पत्नी ठार तर सहा वर्षांची चिमुरडी गंभीर

0
अनखोडा येथील दुचाकीस्वारांना भरधाव ट्रकने चिरडले,पती-पत्नी ठार तर सहा वर्षांची चिमुरडी गंभीर


आष्टी (अशोक खंडारे) :- चंद्रपूर ते गोंडपिपरी मार्गावरील धानापूर गवाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत पती-पत्नीचा मृत्यू झाला, तर त्यांची सहा वर्षांची चिमुरडी गंभीर जखमी झाली आहे. सोमवार (६ एप्रिल) सायंकाळी सुमारे ४ वाजताच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली असून परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गौतम सुरेश निमसरकर (३५) हे पत्नी वैशाली निमसरकर (३२) आणि मुलगी सिया (६) हिला घेऊन दुचाकीने चंद्रपूर वरुन आपल्या  दिशेने येत होते. धानापूर गावाजवळ समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने (क्रमांक एमएच-३४/ एबी-२३२४) त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, गौतम निमसरकर यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच सुरजागड पेट्रोलिंग अधिकारी प्रदीप येल्लुरे आणि गोंडपिपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या वैशाली निमसरकर आणि चिमुरडी सियाला तातडीने गोंडपिपरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान वैशाली निमसरकर यांचाही मृत्यू झाला.
या अपघातामुळे आई-वडिलांच्या छत्रछायेखाली सुखाने जगणारी सहा वर्षांची सिया एका क्षणात पोरकी झाली आहे. तिच्यावर सध्या उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.
निमसरकर कुटुंब हे गडचिरोली जिल्ह्यातील अनखोडा (ता. चामोर्शी) येथील रहिवासी असून, या घटनेमुळे गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघातानंतर संबंधित ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया गोंडपिपरी पोलीस ठाण्यात सुरू होती.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !