“दारूबंदी व रेती तस्करी कागदावरच का?” — आ. नरोटे
गडचिरोली, दि. १ एप्रिल :
गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारू विक्री आणि रेती तस्करी हप्तेखोरीच्या आधारे खुलेआम सुरू असल्याचा धक्कादायक आरोप स्थानिक आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी पत्रकार परिषदेत करताच संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सत्ताधारी पक्षाच्या आमदाराकडूनच प्रशासनावर थेट आरोप झाल्याने पोलीस, जिल्हा प्रशासन आणि उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या पालकत्वाखालील संवेदनशील जिल्ह्यात अशा प्रकारचे अवैध धंदे सुरू असल्याचे उघड होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोली मुख्यालयाजवळील कोडगल गावातील ग्रामस्थांनी अवैध दारू विक्रीविरोधात आक्रमक भूमिका घेत आंदोलन छेडले.
कोडगल ग्रामपंचायतीने २६ जानेवारी २०२६ रोजी ग्रामसभेत ठराव मंजूर करून गावात अवैध दारू विक्री पूर्णतः बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाची माहिती प्रशासनाला देऊनही प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांचा संयम सुटला आहे.
आज शेकडो ग्रामस्थांनी सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती समितीचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली पोलीस ठाणे तसेच उत्पादन शुल्क (दारूबंदी) विभाग येथे मोर्चा काढत निवेदन सादर केले.
हातात फलक घेऊन “दारूबंदीची अंमलबजावणी करा”, “अवैध धंदे बंद करा” अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला.
ग्रामस्थांच्या मते, गडचिरोली जिल्ह्यात मागील ३० वर्षांपासून दारूबंदी लागू असली तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी खुलेआम अवैध दारू विक्री सुरू आहे. काही भागांत तर बियर बारसारखी व्यवस्था करून विक्री होत असल्याचे प्रकार वारंवार समोर येत असूनही प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने संशय अधिकच बळावला आहे.
दरम्यान, आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत हा मुद्दा राज्याच्या सर्वोच्च पातळीवर मांडणार असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, हा विषय ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून देणार असून रेती तस्करीबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांनाही माहिती देणार आहेत.
“मुख्यमंत्र्यांच्या पालकत्वाखालील जिल्ह्यात कोणत्याही परिस्थितीत अवैध धंदे सुरू राहू दिले जाणार नाहीत. ग्रामस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनावर दबाव आणून तातडीने कारवाई केली जाईल,” अशी ठाम भूमिका त्यांनी व्यक्त केली. कोडगल गावातील अवैध दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, अवैध दारू विक्री आणि रेती तस्करीवर तात्काळ कठोर कारवाई न झाल्यास भविष्यात आणखी तीव्र आंदोलन उभारले जाईल.
गडचिरोली जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था आणि दारूबंदी धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलणे अत्यावश्यक असल्याची भावना सर्वसामान्य नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

