आष्टीतील वनउपज तपासणी नाक्यावरुन अवैध वाहने सुसाट ?
आष्टी (अशोक खंडारे):-
आष्टी परिसरातील शिवाजी चौक मार्गावरील वनविभागाच्या अखत्यारीतील वनउपज तपासणी नाका सध्या केवळ नावापुरताच उरल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एकेकाळी अवैध वाहतुकीवर वचक ठेवणारा हा नाका आज ‘शोभेची वास्तू’ बनला असून, कोणतीही प्रभावी तपासणी न होताच शेकडो वाहने बिनधास्तपणे ये-जा करत असल्याचे चित्र आहे.
माहितीनुसार, या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वनउपज तसेच इतर साहित्याची वाहतूक होते. मात्र तपासणी नाक्यावर आवश्यक ती कडक तपासणी होत नसल्यामुळे अवैध वाहतुकीला अक्षरशः खतपाणी मिळत आहे. अनेकदा वाहनांची तपासणी तर सोडाच, साधी नोंदही घेतली जात नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे, या नाक्यावर पूर्वी सर्व वाहनांची बॅरिकेट्स लावून सखोल तपासणी केली जात होती. वाहनांची नोंद घेऊनच त्यांना पुढे सोडण्यात येत होते. यामुळे अवैध वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात आळा बसत होता. मात्र सध्या परिस्थिती पूर्णतः बदलली असून तपासणी यंत्रणा निष्क्रिय झाल्याचे दिसून येत आहे.
वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने सुमारे ३० ते ३५ वर्षांपूर्वी हा तपासणी नाका उभारण्यात आला होता. या नाक्यावर तीन वनरक्षक, एक वनपाल, एक चौकीदार व एक वनमजूर अशी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तरीदेखील प्रत्यक्षात तपासणी होत नसल्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग व नाली बांधकामाच्या कामादरम्यान या नाक्याचे कार्यालय काही काळ हलवण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा कार्यरत करण्यात आले असले तरी तपासणीचा कारभार मात्र थंडावलेलाच आहे.
स्थानिकांच्या मते, दिवसाढवळ्या अनेक वाहने कोणतीही अडथळा न येता मार्गक्रमण करतात. यामुळे अवैध वाहतुकीला उत्तेजन मिळत असून वनसंपत्तीच्या संरक्षणावर मोठा धोका निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर वनविभागाने तात्काळ कठोर पावले उचलून तपासणी नाका प्रभावीपणे सुरू करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा हा नाका केवळ ‘नावापुरता’च राहील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

