भूसंपादनावरून चामोर्शी तालुक्यात राजकीय खळबळ, शेतकऱ्यांच्या संतापात सत्ताधारी नेते सापडले कोंडीत
एका बाजूला विकासाचा मुद्दा, दुसरीकडे जमिनी वाचविण्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन
गडचिरोली :
जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात प्रस्तावित औद्योगिक प्रकल्पासाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेवरून गडचिरोली जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले आहे. सुपीक जमिनीच्या अधिग्रहणाविरोधात शेतकऱ्यांनी तीव्र भूमिका घेतल्याने सत्ताधारी पक्षातील स्थानिक नेतेही कोंडीत सापडल्याचे चित्र दिसून येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रस्तावित प्रकल्पासाठी चामोर्शी तालुक्यातील सुमारे ३,४०० हेक्टर सुपीक जमीन अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेमुळे परिसरातील अनेक गावांतील शेकडो शेतकऱ्यांचे कुटुंबांचे उपजीविकेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत जोरदार आंदोलन छेडले असून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे
जमिनी गमावण्याच्या भीतीने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी विविध प्रकारे निषेध नोंदवत आपली भूमिका ठामपणे मांडली असून प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलकांनी केलाला असताना भूसंपादनाचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
या प्रकरणामुळे स्थानिक राजकारणातही खळबळ उडाली आहे. एकीकडे उद्योगांच्या माध्यमातून विकास साधण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, तर दुसरीकडे शेती व जमिनीचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. परिणामी स्थानिक लोकप्रतिनिधींवर दोन्ही बाजूंनी दबाव वाढल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, विरोधी पक्षांनीही या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर टीका सुरू केली असून शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहण्याची भूमिका घेतली आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांशी चर्चा करून या प्रश्नावर तोडगा काढावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
भूसंपादनाच्या या वादामुळे गडचिरोली जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले असून या प्रश्नावर प्रशासन पुढे काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

