आष्टी–आलापल्ली मार्गावर मार्कंडा (कं) जवळ दुचाकीस्वारास आज्ञात वाहनाने चिरडले एक इसम जागीच ठार
सुरजागड खनिज वाहतुकीच्या वाहनांवर संशय, कुटुंबियांचा गंभीर आरोप
आष्टी (अशोक खंडारे):-
आष्टी–आलापल्ली मार्गावर मार्कंडा कंन्सोबा जवळील वनविकास महामंडळ डेपो समोर एका अज्ञात वाहनाने काल दि. २१ मार्चला सात ते आठ वाजताचे दरम्यान दुचाकीस्वारास चिरडल्याने तो इसम जागीच ठार झाला भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतकाची ओळख भारत शेंडे (वय ४२, रा. हळदी (माल) अशी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारत शेंडे हे कामानिमित्त आष्टी येथे आले होते. मात्र, नियतीने घात केला आणि परतीच्या किंवा प्रवासादरम्यान अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच मृत्यूमुखी पडले.
घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील कार्यवाहीसाठी आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
⚠️ कुटुंबियांचा गंभीर आरोप
दरम्यान, मृतकाच्या कुटुंबियांनी या अपघातासाठी सुरजागड परिसरातून मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या कच्च्या लोहखनिज वाहतुकीला जबाबदार धरले आहे. “या मार्गावर अवजड वाहनांची बेफाम वाहतूक सुरू असून त्यातूनच हा अपघात झाला असावा,” असा आरोप त्यांनी केला.
✋ शवविच्छेदनास नकार
अज्ञात वाहनाचा शोध घेऊन संबंधित वाहन चालक व मालकाला समोर आणल्याशिवाय शवविच्छेदन होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका कुटुंबियांनी घेतली आहे. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
भारत शेंडे हे रोजंदारीवर काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या अचानक मृत्यूमुळे कुटुंबावर मोठे दुःख कोसळले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे
या घटनेनंतर स्थानिक नागरिक व कुटुंबियांनी अज्ञात वाहनाचा तात्काळ शोध घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच मृतकाच्या कुटुंबास योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.
🚨 रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
या अपघातामुळे आष्टी–आलापल्ली मार्गावरील वाढत्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे निर्माण झालेल्या रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
या अपघाताची आष्टी पोलीसांनी योग्य चौकशी करून अज्ञात वाहनाचा शोध घेऊन मृतक इसमाचे कुटुंबाला आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे आष्टी परिसरातील जनतेनी मागणी केली आहे

