“निवडणुकीपुरतेच लोकप्रतिनिधी काय? कामगारांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष
आष्टी पेपर मिल प्रकरणात स्थानिक प्रतिनिधींची अनुपस्थिती; कामगार व नागरिकांचा सवाल — संकटात असताना फिरविली पाठ
चामोर्शी : तालुक्यातील आष्टी येथील पेपर मिल कामगारांच्या २४ फेब्रुवारी पासून सुरू असलेल्या साखळी उपोषण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक लोकप्रतिनिधींनी अद्याप भेट न दिल्याने कामगार व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. “लोकप्रतिनिधी फक्त निवडणुकीच्या वेळी पायापोटी करतात मात्र संकट काळात दिसत नाहीत असे का?” असा सवाल आंदोलनकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.
कामगारांचे साखळी उपोषण आणि आंदोलन सलग सुरू असताना त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी किंवा तोडगा काढण्यासाठी कोणत्याही प्रमुख प्रतिनिधीने पुढाकार घेतलेला नाही, असा आरोप करण्यात येत आहे त्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, रोजगार आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर असताना जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष भेट देऊन कामगारांना दिलासा देणे अपेक्षित होते. मात्र, या दुर्लक्षामुळे संताप वाढत असून आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कामगार संघटनांनी तातडीने संवाद साधून ठोस निर्णय जाहीर करण्याची मागणी केली असून, अन्यथा आंदोलनाचा पुढील टप्पा जाहीर करण्याचा इशारा दिला आहे.

