महीला व बाल रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे ११ महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू

0
महीला व बाल रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे ११ महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू



गडचिरोली, दि. ५ :

गडचिरोली शहरातील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात ११ महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत बालिकेच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच हा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप केला असून या घटनेमुळे रुग्णालय परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली तालुक्यातील दिबना या गावाच्या लेनगुरे कुटुंबातील वंशिका (वय ११ महिने) या बालिकेला किरकोळ उपचारासाठी मंगळवारी दुपारी सुमारे १२.३० वाजताच्या सुमारास गडचिरोली येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दाखल केल्यानंतर डॉक्टरांकडून तिच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आणि पुढील उपचार सुरू करण्यात आले होते.

मात्र बुधवारी दुपारी सुमारे ३ वाजताच्या सुमारास बालिकेचा अचानक मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. प्राथमिक माहितीनुसार, निमोनियामुळे श्वास गुदमरल्याने बालिकेचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

मृत बालिकेच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, बालिकेला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिच्या शरीरात रक्ताची कमतरता आहे किंवा तिला निमोनिया आहे, अशी कोणतीही माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली नव्हती.

कुटुंबीयांनी वारंवार विचारणा करूनही “बालिकेची प्रकृती ठीक आहे, घाबरण्याचे कारण नाही” असे सांगत डॉक्टर वेळ मारून नेत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

या घटनेची माहिती मिळताच गडचिरोली शहरातील काही राजकीय पदाधिकारी व नागरिकांनी रुग्णालयात धाव घेतली. या प्रकरणात हलगर्जीपणाचा आरोप असलेले डॉ. आशिष शेडमाके हे घटनेनंतर संपर्काबाहेर असल्याची माहिती समोर आली असून रुग्णालय प्रशासनालाही त्यांचा ठावठिकाणा लागत नसल्याचे सांगण्यात आले

घटनेनंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी डॉ. आशिष शेडमाके यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे, अशी मागणी केली आहे. वाढता तणाव लक्षात घेऊन रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून नातेवाईकांशी चर्चा करत परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच पोस्टमॉर्टम अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिस प्रशासनाने दिली

दरम्यान, जिल्हा महिला व बाल रुग्णालयाच्या अध्यक्ष डॉ. माधुरी कीलनाके यांनी सांगितले की, बालिका वंशिकाला काल दुपारी सुमारे १२.३० वाजता दाखल करण्यात आले होते. त्या वेळी तिच्या शरीरात ऑक्सिजनची कमतरता किंवा निमोनियाची गंभीर लक्षणे आढळून आली नव्हती.

मात्र अचानक निमोनियामुळे तिच्या गळ्यात कफ साचून श्वास गुदमरल्याने मृत्यू झाला असावा, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. या घटनेची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या रुग्णालयात १०० रुग्णांची क्षमता असतानाही प्रत्यक्षात २०० ते ३०० रुग्ण दाखल असतात, त्यामुळे डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कामाचा ताण असल्याची बाब समोर आली आहे

या प्रकरणावरून काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीही रुग्णालय प्रशासनावर टीका केली आहे. काही डॉक्टर वेळेवर रुग्णालयात उपलब्ध राहत नसून खाजगी प्रॅक्टिस करण्याकडे त्यांचा अधिक कल असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 

दरम्यान, अवघ्या ११ महिन्यांच्या निष्पाप बालिकेचा मृत्यू झाल्याने तिच्या आई-वडिलांनी रुग्णालयातच आक्रोश व्यक्त केला. आपल्या लेकराचा मृत्यू डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

या घटनेमुळे मुख्यमंत्र्यांच्या पालकत्व असलेल्या जिल्ह्याच्या मुख्यालयातच आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या प्रकरणात प्रशासन नेमकी काय कारवाई करते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !