विमान दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुःखद निधन; गडचिरोलीत सर्वपक्षीय शोकसभा

0
विमान दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुःखद निधन; गडचिरोलीत सर्वपक्षीय शोकसभा.




गडचिरोली (प्रविण तिवाडे):-
 विमान दुर्घटनेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुःखद निधन झाल्याने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात असलेल्या राजीव गांधी भवन येथे आज सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले.

ही शोकसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष लीलाधर भरडकर यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आली होती. सभेसाठी गडचिरोली शहरासह परिसरातील हजारो नागरिकांनी उपस्थिती लावली. त्यामुळे परिसरात शोकमय वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी बोलताना उपस्थितांनी अजित पवार यांच्या कार्यकर्तृत्वाचा आणि ठाम नेतृत्वाचा गौरव केला. गडचिरोली जिल्ह्यातील विकासकामांतील अडचणी सोडवण्यासाठी ते नेहमीच सकारात्मक आणि ठोस भूमिका घेत असत, असे वक्त्यांनी नमूद केले. त्यांच्या अकाली निधनाने 'दादा' हे नावच जणू पोकळ झाले असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत होती. महाराष्ट्राच्या राजकारणात दबदबा निर्माण करणारे नेतृत्व आज आपल्यातून निघून गेले, अशी भावनिक प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.


शिस्तप्रिय, स्पष्टवक्ते आणि वेळेचे काटेकोर नियोजन करणारे नेता म्हणून अजित पवार यांची ओळख होती. त्यांच्या शब्दांतील कठोरपणा देखील आपुलकी आणि प्रेमातूनच येत असल्याचे अनेकांनी सांगितले. सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी कार्यकाळ पूर्ण केला असून, सलग 11 वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे.



या सभेत विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या शोक सभेत गडचिरोली चे आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी खासदार डॉ. अशोक नेते, माजी आमदार तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवराव होळी, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रा रमेश बारसागडे, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, काँग्रेस चे नगरसेवक सतीश विधाते, काँग्रेस चे जेष्ठ नेते सुरेश सावकार पोरेड्डीवार, दैनिक हीतवाद चे जिल्हाप्रतिनिधी रोहिदास राऊत, काँग्रेस चे प्रदेश महासचिव ऍड. विश्वजित कोवासे, विजय गोरडवार, कविता मडावी, शिवसेना उबाठा चे पवन गेडाम, वासुदेव शेडमाके, गडचिरोली नगराध्यक्ष ऍड. प्रणोती निंबोळकर, राष्ट्रवादीच्या महिला नेत्या अँड. कविता

मोहरकर, अमिता मडावी, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद च्या जिल्हा सचिव विद्या दुग्गा, शहर अध्यक्ष आरती कोल्हे, रेखा तोडसे, नारिशक्ती च्या अध्यक्षा जयश्री येरमे, लक्ष्मी कन्नाके, प्रकाश ताकसांडे, नितेश राठोड, छाया कुंभारे, शिवसेना शिन्दे गटाचे हेमंत जांबेवार, दीपक भारसाकडे, अरबाज शेख, मनीषा मडावी, नगरसेविका प्रतिभा कुमरे, मधुकर भांडेकर, नगरसेवक रवी मेश्राम, कुसुम आलाम, भाजपा जेष्ठ नेते रमेश भुरसे, उपस्थित

मान्यवरांनी स्व. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वगुणांना, विकासाभिमुख निर्णयांना व राज्याच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेल्या कार्याला उजाळा देत आठवणी सांगितल्या. यावेळी अनेक मान्यवरांनी विधिमंडळातील अनुभव शेअर करत अजितदादा पवार यांच्यासोबत जिल्हा विकासासाठी अनेकवेळा झालेल्या चर्चाची आठवण सांगितली.

जनतेशी असलेला थेट संवाद, प्रशासकीय निर्णयक्षमता आणि शेतकरी व ग्रामीण भागासाठी घेतलेले ठोस निर्णय याबाबत वक्त्यांनी भावना व्यक्त केल्या.

सभेचे प्रास्ताविक नगरपरिषद सभापती तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर यांनी केले. तर संचालन हर्षवर्धन मडावी यांनी केले. यावेळी सभेत उपस्थित मान्यवरांनी स्व. मा. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वगुणांना, विकासाभिमुख निर्णयांना व राज्याच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेल्या कार्याला उजाळा देत आठवणी सांगितल्या.

या आठवणींनी सभागृहातील उपस्थितांचे हृदय स्पर्शले आणि स्व. अजितदादा पवार यांच्या प्रामाणिक नेतृत्वाचे महत्त्व अधोरेखित केले. सर्व उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्यप्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि त्यांच्या योगदानाला मानाचा मुजरा केला.

या शोकसभेत सर्वपक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन मिनिटांचे मौन पाळून अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !