गडचिरोली जिल्ह्यातील अवैध सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांकडून अटक, १२.७० लाखांचा मुद्देमाल जप्त
गडचिरोली :- जिल्ह्यात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखूची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील दोन तरुणांना गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. देसाईगंज आणि कुरुड गावातील रहिवासी असलेल्या या आरोपींकडून पोलिसांना १२ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया-बालाघाट मार्गावरून सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने गोंदिया जिल्ह्याच्या बालाघाट मार्गावरील विजयनगर येथे नाकाबंदी केली. नाकाबंदीदरम्यान, संशयित टाटा नेक्सॉन चारचाकी वाहन क्रमांक MH 35 AC 6369 येताना दिसले. पोलिसांनी वाहन थांबवून त्याची तपासणी केली असता, त्यामध्ये ९ नग खाकी रंगाचे खरडे बॉक्स आढळले. या प्रत्येक बॉक्समध्ये २०० डब्बे, असे एकूण १ हजार ८०० डब्बे प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि वापरलेले वाहन जप्त करण्यात आले
पोलिसांनी याप्रकरणी दोन तरुणांना अटक केली आहे, जे देसाईगंज तालुक्यातील रहिवासी आहेतः१. रितेश रामलाल नागदेवे (वय ४५ वर्षे, रा. देसाईगंज, जि. गडचिरोली) २. नेताजी लोचन गणवीर (वय ३२ वर्षे, रा. कुरुड, ता. देसाईगंज, जि. गडचिरोली)या कारवाईत पोलिसांनी टाटा नेक्सॉन वाहन आणि सुगंधित तंबाखूचे डब्बे, असा एकूण १२ लाख ७० हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. दोन्ही आरोपींवर भारतीय न्यायसंहिता (कलम १२३, २१४, २२३, २७४, २७५) आणि अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम (कलम २६ (२) (आय), २६ (२) (आयव्ही), २७ (३) (ब), ३(१) (झेडझेड) (आयव्ही), २७ (३) (ड), ३(२) (३), ५९) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सदरची कारवाई गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या निर्देशानुसार आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये एपीआय धिरज राजुरकर, पोलीस हवालदार संजय चव्हाण, सहाय्यक फौजदार राजू मिश्रा, सोमेंद्रसिंह तुरकर, तुलसीदास लुटे, दीक्षितकुमार दमाहे, राकेश इंदुरकर आणि चालक पोलीस शिपाई राम खंडारे यांचा समावेश होता. जिल्हयात अवैध धंद्यांवर चाललेल्या या मोठ्या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत

