स्कार्पिओ-दुचाकीच्या धडकेत पती ठार तर पत्नी गंभीर
गडचिरोली :- भरधाव स्कार्पिओ व दुचाकी वाहनांच्या धडकेत पती जागीच ठार तर पत्नी गंभीर झाल्याची घटना शहराजवळील चामोर्शी रोडवर समता नगर नजीक २० मार्च गुरुवारला दुपारी सुमारे दीड वाजताच्या सुमारास घडली
मिळालेल्या माहितीनुसार, स्कार्पिओ वाहन चामोर्शीहून गडचिरोली शहराच्या दिशेने येत होते, तर दुचाकीस्वार इंदिरा गांधी चौकाकडून आपल्या घरी समता नगर येथे जात होता. रस्त्यातील वळणाजवळ पोहोचताच दुचाकीस्वाराने अचानक उजवीकडे वळण घेतले. याच वेळी समोरून येणाऱ्या स्कार्पिओ वाहनाशी त्याची जोरदार धडक झाली.
या अपघातात हेमंत देवनाथ शेंडे वय 46 वय रा. औंधी, जि. मानपूर, छत्तीसगड - हल्ली मुक्काम गडचिरोली यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी नीतू हेमंत शेंडे वय 37 वर्षे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे.
अपघातानंतर स्कार्पिओ चालक सुधीर भुरले वय 31 वर्षे रा.गडचिरोली यांनी प्रसंगावधान राखत जखमी महिलेला व मृतदेहाला तात्काळ सामान्य रुग्णालयात हलविले. त्यानंतर त्यांनी स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर होऊन घटनेची माहिती दिली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहेत

