गडचिरोली:- एकीकडे देश 'डिजिटल इंडिया' आणि '5G' क्रांतीच्या घोषणा करत असताना महाराष्ट्राच्या टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यातील तुमरकोठी हे गाव आजही विकासापासून कोसो दूर आहे. राज्याचे मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यात च प्रशासकीय अनास्थेचा कळस पाहायला मिळत असून, गावात वीज नसतानाही हातात पडणाऱ्या बिलांमुळे येथील आदिवासी बांधवांच्या जखमेवर मीठ चोळले जात आहे.
छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या भामरागड तालुक्यातील अतिसंवेदनशील आणि दुर्गम अशा तुमरकोठी गावात फक्त 45 घरे आणि 200 लोकसंख्या असलेल्या या गावात महावितरण विभागाने 2020 मध्ये विद्युत खांब उभे केले. गावात एकही पथदिवेही नाहीत. वीज पोहचविण्यासाठी घराघरांत मीटरही लावले आहेत. मात्र खांबाना लावलेल्या तारा मधून वीज प्रवाहित झालेली नाही. ज्या घरात अजून विजेचा दिवा लागलेला नाही, त्या गरीब आदिवासींना महावितरणने 2022 मध्ये चक्क विजेचे बिल पाठवून त्यांची क्रूर थट्टा केली. याबाबत गावकऱ्यांनी आवाज उठविल्यानंतर महावितरणने बिल पाठवणे बंद केले होते.
नुकतीच 19 डिसेंबरला अती दुर्गम तुमरकोठी येथे अवघ्या 24 तासात गडचिरोली पोलिसां कडून नवीन पोलिस ठाण्याची स्थापना करण्यात आली.ज्यामुळे या नक्षल-प्रभावी भागाला सुरक्षा आणि विकासाची नवी दिशा मिळाली आहे. या पोलीस ठाण्याचे उद्घाटन अपर पोलीस महासंचालक छेरिंग दोरजे यांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे दुर्गम भागातील नागरिकांना प्रशासकीय सुविधा उपलब्ध होणार. सुरक्षेच्या दृष्टीने गावात पोलिस आल्यामुळे आता तरी गावात 'प्रकाश' येईल, अशी आशा तुमरकोटी ग्रामस्थांना आहे. मात्र, पोलिस विभागाची यंत्रणा सक्रिय झाली असली तरी महावितरण विभागाचा सुस्त कारभार गावातील अंधार दूर करण्यास तयार नाही.
आजच्या युगात मोबाईल ही मूलभूत गरज बनली आहे. तुमरकोठी गावातील तरुणांच्या हातात मोबाईल आहेत, मात्र चार्ज करायला वीज नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

