आदिवासीचे जीवनवास्तव प्रखर असून तो जगण्यासाठी झगडतो आहे-डॉ. अनिरुद्ध वनकर

0
आदिवासीचे जीवनवास्तव प्रखर असून तो जगण्यासाठी झगडतो आहे-डॉ. अनिरुद्ध वनकर 



आष्टी: आजचा आदिवासी माणूस जंगलातून हद्दपार होतोय ,जमिनीवर परका ठरतोय.पाहिले नाटक आदिवासींनी केले.आज आदिवासी रंगमंचावर उभा आहे  पण पायाखालची माती त्याची नाही .नाटक जर आदिवासींच्या जीवनाचा आरसा असेल तर
 त्या आरशात विकृती नको सत्य हव.नाटकात तो रडतो, नाचतो, मरतो पण वास्तवात तो जगण्यासाठी झगडतो आहे, असे प्रतिपादन लोकशाहीर, प्रबोधनकार,लोकजागृतीचे निर्माता, नाटककार, दिग्दर्शक, कलावंत डॉ. अनिरुद्ध वनकर यांनी केले.
ते मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई अनुदानित वन वैभव शिक्षण मंडळ अहेरी द्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय आष्टी येथे आयोजित गडचिरोली जिल्हा पहिले आदिवासी साहित्य संमेलनात आदिवासी जीवनवास्तव व नाटक या विषयावरील परिसंवादात अध्यक्षस्थानावरून  बोलत होते.विचारपीठावर संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. विनायक तुमराम, स्वागताध्यक्ष मा. अब्दुल जमीर हकीम, प्राचार्य डॉ. संजय फुलझेले, संयोजक डॉ. राजकुमार मुसणे, रंगभूमी प्रयोग निरीक्षण मंडळ सदस्य तथा नाट्यकलावंत मा. मुकेश गेडाम, नाटककार हरिराम कोटनाके, नाट्य कलावंत विश्वास पुडके, चिदानंद सिडाम, विशाखा कडूकर, लोकेशकुमार, पौर्णिमा तायडे, मनिषा देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात पुढे बोलताना लोकप्रिय गायक डॉ. अनिरुद्ध वनकर यांनी घायाळ या नाटकांच्या आधारे विचार व्यक्त करून आदिवासीचा अस्सल हुंकार, वेदना नाटकातून येणे गरजेचे असल्याचे सांगून श्रोत्यांना अंतर्मुख केले. माझी माय या लोकप्रिय गीत गायनाने डॉ.अनिरुद्ध वनकर यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.प्रमुख वक्ते नाट्य निर्माता, दिग्दर्शक, नाट्यकलावंत डॉ. शेखर डोंगरे यांनी आदिवासी जीवन वास्तव दर्शविणारी नाटके तुरळक स्वरूपामध्ये आली. त्यातली बोटावर मोजणारी प्रकाशित झाली.अनेक संहितांचे प्रयोग झाले.परंतु त्यात केवळ आदिवासींच्या वेदना, अवहेलना, दारिद्र्य ,दुःख व शोषण याचे चित्रण प्रकर्षाने करण्यात आले असल्याचे सांगितले. त्यातही नाटक पाहणारे प्रेक्षक किती? नाटक पाहिल्याने त्यांच्या जीवनमानात कितपत बदल घडला, हा चिंतनाचा विषय आहे.आदिवासींच्या जीवनातील गंभीर प्रश्न जटिल आणि गुंतागुंतीचे आहेत . वर्ण व वर्ग विषमतेने नागावला गेलेले आदिवासी बांधव अजून एक दुर्लक्षित आहेत त्यांचे वनवासीकरण करणे सुरू आहे .मूळ संस्कृती पासून त्यांना हद्दपार करण्याची प्रक्रिया खाऊजा व भांडवलशाही धोरणामुळे फोफावली आहे. अनेक धर्म प्रसारक आदिवासींचे वंश विच्छेदन करू पाहत आहेत. उदात्त आणि उन्नत निसर्गापासून हद्दपार होणारा आदिम बांधव व त्याचे प्रत्ययकारी चित्रण नाटकातून फारसे दिसत नसल्याची खंत निर्माता, दिग्दर्शक, नाट्यकलावंत ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. डॉ.शेखर डोंगरे यांनी व्यक्त केली. मुकेश गेडाम यांनी  का रक्त पिता गरिबाचे नाटकाच्या माध्यमातून आदिवासींचे जीवन वास्तव स्पष्ट केले. नाट्य कलावंत चिदानंद सिडाम यांनी आदिवासींची दयनीयता अधोरेखित करत गांभीर्य मांडले.परिसंवादात वक्त्यांनी आदिवासी जीवन वास्तव आणि नाटक या अनुषंगाने विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे उत्तम संचालन प्रा. गायत्री खरवडे यांनी तर उपस्थिताचे आभार मुख्य संयोजक डॉ. राजकुमार मुसणे यांनी मानले. कार्यक्रमास साहित्य प्रेमी, लेखक, नागरिक उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !