दिवसाढवळ्या धारदार शस्त्राने केला एका तरुणाचा खून

0
दिवसाढवळ्या धारदार शस्त्राने केला एका तरुणाचा खून 



गडचिरोली, दि. १६ मार्च :
गडचिरोली जिल्हा मुख्यालयातील लांझेडा परिसरात सोमवारी (१६ मार्च) भरदिवसा एका युवकाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत विवेकानंद नगर येथील सचिन कोल्हुरवार (वय ३५) यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सचिन कोल्हुरवार आणि आरोपी यांच्यात गेल्या काही वर्षांपासून पैशांच्या व्यवहारावरून वाद सुरू होता. सन २०१९ मध्ये सचिन यांनी आरोपीला फर्निचर तयार करण्यासाठी सुमारे सव्वा लाख रुपये दिले होते. मात्र आरोपीने ना फर्निचरचे काम केले ना पैसे परत केले. यावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते.
सोमवारी आरोपीने सचिन कोल्हुरवार यांना पैसे देण्याच्या बहाण्याने लांझेडा वार्डातील आपल्या फर्निचर कामाच्या ठिकाणी बोलावले. तेथे पुन्हा पैशांच्या कारणावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. वाद वाढत जाऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. संतापाच्या भरात आरोपीने जवळील धारदार अवजाराने सचिन यांच्यावर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात सचिन कोल्हुरवार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच गडचिरोली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला असून शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. भरवस्तीत आणि दिवसाढवळ्या झालेल्या या हत्येमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)

vaingangavarta19

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !