BRAKING NEWS
पत्नीला माहेरी सोडण्यासाठी जात असताना वाटेतच गळा दाबून केला खून
गडचिरोली :- पत्नीला माहेरी सोडण्यासाठी जात असताना वाटेतच पतीने गळा दाबून खून केला ही धक्कादायक घटना कोरची तालुक्यातील सोनपूर गावाजवळ उघडकीस आली आहे
सतत पत्नीवर संशय व्यक्त करीत असताना वाद विकोपाला गेल्याने पत्नीला माहेरी सोडायला जाताना वाटेत पुन्हा वाद विकोपाला गेला अन् पतीने हे थराराक कृत्य केले. या प्रकरणी आरोपी पतीस कोटगुल पोलिसांनी ५ सप्टेंबर रोजी अटक केली आहे.
टामिनबाई पुरुषोत्तम कचलाम असे मृत पत्नीचे तर पुरुषोत्तम गजराज कचलाम रा. सोनपूर, ता. कोरची जिल्हा गडचिरोली असे आरोपी पतीचे नावे आहे. टामिनबाई हिचे माहेर छत्तीसगडचे आहे. या दाम्पत्याच्या लग्नाला दहा वर्षे झाली होती. मात्र, पुरुषोत्तम हा सतत तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन वाद घालत असे.
३१ ऑगस्ट रोजी पुन्हा पती-पत्नीमध्ये वाद झाला. १ सप्टेंबर रोजी आरोपीने पत्नीला माहेरी सोडण्यासाठी पायदळी जात असत सोनपूर-कोडगुल दरम्यानच्या कामेली जंगल परिसरात पुन्हा भांडण झाले. संतापाच्या भरात आरोपीने पत्नीच्या छातीवर बसून गळा दाबून तिचा खून केला. मृतदेह तेथेच सोडून तो गावात परतला. दारूच्या नशेत पत्नीचा खून केल्याची कबुलीही दिली.
या घटनेची माहिती मृतकाची आई चमरीबाई बोगा रा. चौकी, जि. मानपूर-मोहला, छत्तीसगड यांना ३ सप्टेंबर रोजी मिळाली. त्यांनी कोटगुल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. आरोपीस सोनपूर येथील शेतशिवारातून अटक करण्यात आली. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कुरखेडा उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कोटगुल पोलीस स्टेशन प्रभारी कृष्णा सोळुंके करीत आहेत.

