BIG Breking
पोलीस व सहकाऱ्याला दोन वाघांच्या चमड्यासह केले जेरबंद तथा खवल्या मांजराचे खवलेही अहेरी येथून जप्त
गडचिरोली : जिल्ह्यातील अहेरी येथील एका पोलीसासह सहकाऱ्याला दोन वाघांच्या कातडीची तस्करी करतांना छत्तीसगडच्या वनविभागाने अटक केली. कांकेर जिल्ह्यातील बांदे परिसरात दुचाकीवरून दोन वाघांच्या कातडी नेताना ही कारवाई करण्यात आली. दरम्यान त्या पोलीस कर्मचाऱ्याच्या अहेरीतील घरातून आलापल्ली वनविभागाच्या पथकाने खवले मांजराचे खवले जप्त केले आहे. यावरून अनेक दुर्मिळ वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या रॅकेटमध्ये ते सहभागी असल्याचा ठपका ठेवत त्या पोलीस कर्मचाऱ्याला पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी तडकाफडकी निलंबित केले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये बाबूराव राजू मडावी (रा.गडअहेरी, ता.अहेरी, जि.गडचिरोली) आणि बियेश्वर विष्णू गेडाम (रा.अहेरी) यांचा समावेश आहे. वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उदंती-सीतानदी व्याघ्र प्रकल्प, वन्यजीव गुन्हे नियंत्रण ब्युरो, राज्यस्तरीय फ्लाइंग स्कॅाड, तसेच आलापल्ली वन विभागाने समन्वय ठेवत या कारवाईत सहभाग घेतला.
तपासादरम्यान आरोपींकडून दोन वाघांची कातडी, 13 वाघांच्या मिशा, एक दुचाकी आणि दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले. प्राथमिक तपासात हे वाघ इंद्रावती-अबुझमाड व्याघ्र अधिवासातून मारून त्यांची कातडी छत्तीसगडमध्ये तस्करीसाठी नेली जात असल्याचे निष्पन्न झाल्याचे वन विभागाने म्हटले आहे.
या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू असून, वन्यजीव संरक्षण अधिनियम, 1972 मधील विविध कलमांनुसार दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागरिकांनी वन्यजीवांशी संबंधित कोणतीही संशयास्पद माहिती तात्काळ वन विभागाला कळवून वन्यजीव संरक्षणाच्या कार्यात सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे

