गुराख्यास जंगली हत्तीने हल्ला करून केले ठार
ग्रामस्थांची वनविभागाकडे तातडीच्या उपाययोजनेची मागणी
गडचिरोली:-(अशोक खंडारे)
जिल्ह्यातील जिल्ह्यातील गडचिरोली तालुका स्थळापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या चुरचूरा परिसरात जंगली हत्तीने एका गुराख्याला ठार केल्याची घटना दि.१० सप्टेंबर ला सकाळी घडली वडसा वनपरिक्षेत्रातील पोर्ला
हद्दीत चुरचुरा येथील वामन मारुती गेडाम हा गुराखी नेहमीप्रमाणे गुरे चारण्यासाठी जंगल परिसरात गेला असता रानटी हत्तीच्या हल्ल्यात जागीच ठार झाला. या दुर्दैवी घटनेनंतर परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांनी वनविभागाकडे तात्काळ उपाययोजनेची मागणी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून अमिर्झा, चुरचुरा, दिभना परिसरात रानटी हत्तींचा कळप सतत वावरत आहे. आज नेहमीप्रमाणे गुराख्याने गुरे राखण्यासाठी जंगलाचा रस्ता धरला असता अचानक आलेल्या हत्तीने त्याच्यावर हल्ला केला. हल्ला इतका जबर होता की त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोर्ला वनपरिक्षेत्र अधिकारी तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून पुढील तपास गडचिरोली पोलिस करीत आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून ओडिशा राज्यातून रानटी हत्तींचे कळप गडचिरोली जिल्ह्यात दाखल होत आहेत. या हत्तींच्या स्थलांतरामुळे शेतजमिनींचे प्रचंड नुकसान होत असून ग्रामस्थांच्या जीवितासही धोका निर्माण झाला आहे. हत्तींचा वाढता वावर वनविभागासाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. अशा पार्श्वभूमीवर आजच्या घटनेने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आणखी गडद झाले असून त्यांनी वनविभागाने तातडीने पावले उचलून हत्तींच्या हालचालींवर नियंत्रण ठेवावे बाधित कुटुंबाला शासनाने तात्काळ मदत द्यावी आणि संरक्षणाची ठोस यंत्रणा उभी करावी, अशी जोरदार मागणी केली आहे. अन्यथा वन विभागाच्या अधिकाऱ्यांस कार्यालयात बंदीस्थ आनंद करण्याचा इशारा दिला आहे


